नंदुरबार जिल्हा बँकेसाठी नेत्यांनी एकत्र यावे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:36 IST2021-03-01T04:36:20+5:302021-03-01T04:36:20+5:30
नंदुरबार : जिल्हा निर्मिती होऊन २२ वर्षांपेक्षा अधिक काळ झाला असला तरी अद्यापही हा जिल्हा परिपूर्ण स्वरूपात उभा राहू ...

नंदुरबार जिल्हा बँकेसाठी नेत्यांनी एकत्र यावे...
नंदुरबार : जिल्हा निर्मिती होऊन २२ वर्षांपेक्षा अधिक काळ झाला असला तरी अद्यापही हा जिल्हा परिपूर्ण स्वरूपात उभा राहू शकलेला नाही. विशेषत: जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा दुवा असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अजूनही दोन्ही जिल्ह्यांसाठी एकच आहे. त्याची खंत काही नेते व्यक्त करीत असले तरी शेतकऱ्यांच्या भावनांना खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप देण्यासाठी आता नंदुरबार जिल्हा बँकेसाठी सर्व नेत्यांनी एकत्र येणे आवश्यक आहे.
धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेची सर्वसाधारण सभा शनिवारी धुळ्यात झाली. बँकेचे मुख्यालय अर्थातच धुळे असल्याने ही सभा धुळ्यातच होते. साहजिकच नंदुरबार जिल्ह्यातील सभासदांना सभेसाठी पोहोचणे जिकिरीचे जाते. काही सदस्य उशिरा पोहोचतात. त्याचा अनुभव शनिवारीदेखील आला. सभेची वेळ अजेंड्यावर ११ वाजता होती. नंदुरबार जिल्ह्यातील सभासद सोडा काही संचालकदेखील ११ वाजेनंतर पोहोचले. सभेचे आभार प्रदर्शन होत असतानाच जिल्हा बँकेचे नंदुरबार जिल्ह्यातील संचालक व शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी सभास्थळी पोहोचले. त्यांनी आभार प्रदर्शन थांबवून थेट आपली भूमिका मांडली. त्यात त्यांनी धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांसाठी स्वतंत्र बँक असाव्यात, असा मुद्दा मांडला. नंदुरबार जिल्हा निर्मिती होऊन २२ वर्षे झाली. एवढी वर्षे धुळे जिल्ह्यातील नेत्यांनी मोठा भाऊ म्हणून नंदुरबारला सांभाळले आता नंदुरबारसाठी स्वतंत्र जिल्हा बँक करण्याची शिफारस शासनाकडे करावी, अशी मागणीही केली. अर्थातच या सभेच्यानिमित्ताने नंदुरबार जिल्हा बँकेच्या मागणीला पुन्हा तोंड फुटले आहे. यापूर्वीदेखील रघुवंशी यांनीच हा मुद्दा लावून धरला होता. आता रघुवंशींबरोबर जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अभिजित पाटील यांनीदेखील हा मुद्दा उचलला आहे. त्यांनीदेखील शनिवारी झालेल्या सभेबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. सभेची वेळ ११ वाजता असताना ११ वाजून चार मिनिटांनी सभा संपते ही बाब दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुळातच जिल्हा बँकेच्या सभेत नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांना मिळणाऱ्या कर्जातील अडचणी, वि.का. सोसायट्यांचे बँकेच्या नियमांमुळे होणाऱ्या अडचणी असे अनेक मुद्दे चर्चेला यावेत, अशी आमची इच्छा असल्याचे अभिजित पाटील यांचे म्हणणे आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील सभासदांना सभास्थळ अर्थात धुळे येथे पोहोचायला धडगाव, अक्कलकुवा येथून निश्चितच अधिक वेळ लागतो. त्यामुळे जर १५-२० मिनिटे सभासदांची वाट पाहिली किंवा संचालकांना सभास्थळी पोहोचण्याबाबत विचारणा झाल्यास वेळेचे व्यवस्थापन करता येऊ शकते. मात्र त्याकडे दुर्लक्ष होते आणि धुळे जिल्ह्यातीलच बहुमतानुसार निर्णय होतात. या भूमिकांमुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सावत्रपणाची वागणूक दिली जात असल्याचा आरोपही अभिजित पाटील यांनी केला आहे.
चंद्रकांत रघुवंशी व अभिजित पाटील या दोघांनी शनिवारच्या सभेबाबत नाराजी व्यक्त करून स्वतंत्र नंदुरबार जिल्हा बँकेच्या मागणीला वाचा फोडली आहे. या दोन्ही नेत्यांनी जिल्हा बँकेसाठी न्यायालयात जाण्याची तयारीही सुरू केली आहे. अर्थातच यासाठी शासनाची भूमिकाही महत्त्वाची राहणार आहे. तसे सूतोवाच बँकेचे विद्यमान अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनीही दिले आहे. शासन दरबारी बँकेच्या विभाजनासाठी जर वजन निर्माण करायचे असेल तर जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी त्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. तसे खासगीत सर्व नेते नंदुरबार जिल्ह्याच्या हितासाठी स्वतंत्र जिल्हा बँक व्हावी, असे मत व्यक्त करतात. परंतु नेत्यांचे हितसंबंध, राजकीय लागेबांधे हे वेगवेगळ्या कारणांनी जिल्हा बँकेच्या सध्याच्या नेतृत्वाशी जुळले आहेत. त्यामुळे सर्वच नेते उघडपणे स्वतंत्र बँकेच्या मागणीसाठी पुढे येत नाहीत हा यापूर्वीचा अनुभव आहे. आता पुन्हा नव्याने चर्चा सुरू झालीच आहे तर या चर्चेचा आवाज अधिक बुलंद करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी नंदुरबार जिल्हा बँकेसाठी सर्व नेते एकत्र येतात की पूर्वीप्रमाणे हा विषय चर्चेतच ठेवतात याकडे आता जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.