ग्रा.पं.निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सर्वच राजकीय पक्षांचे नेते ‘क्वॅारंटाईन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 12:30 IST2021-01-14T12:30:43+5:302021-01-14T12:30:52+5:30
रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : निवडणूक कुठलीही म्हणा, त्याच्या पूर्वसंध्येच्या राजकीय घडामोडींना खूप महत्व असते. मात्र, जिल्ह्यातील ...

ग्रा.पं.निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सर्वच राजकीय पक्षांचे नेते ‘क्वॅारंटाईन’
रमाकांत पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : निवडणूक कुठलीही म्हणा, त्याच्या पूर्वसंध्येच्या राजकीय घडामोडींना खूप महत्व असते. मात्र, जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच सर्वच पक्षातील राजकीय नेते कोरोनामुळे ‘क्वॅारंटाईन’ असल्याने तो एक वेगळा चर्चेचा विषय ठरला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात ६४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका असून त्यासाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. या मतदानासाठी एक लाख १३ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गेल्या आठवडा भरापासून निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रचाराचा प्रचंड धुराळा सुरू होता. बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये चुरस आहे. काही ठिकाणी भाऊबंदकीतच चुरस होत आहे. कॅांग्रेस, राष्ट्रवादी कॅाग्रेस, शिवसेना व भाजप या चारही प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. बुधवारी या निवडणुकीसाठी प्रचाराची सांगता झाली.
प्रचार संपला तसे निवडणुकीतील उमेदवार, गटनेते व प्रमुख कार्यकर्ता यांचे पावले नेत्यांच्या घराकडे वळली. मात्र सर्वच पक्षांचे नेते सद्या कोरोनामुळे क्वॅारंटाईन असल्याने महत्वाचे राजकीय डावपेच रचण्यासाठी नेत्यांच्या भरोवशावर असलेल्या उमेदवारांची व गटनेत्यांची मात्र चांगलीच पंचाईत झाली.
जिल्ह्यातील नेत्यांपैकी आमदार डॅा.विजयकुमार गावीत व खासदार डॅा.हिना गावीत यांचा कोरोना चाचणी अहवाल कालच पॅाझिटिव्ह आला आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे यांचाही अहवाल पॅाझिटिव्ह आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॅा.अभिजीत मोरे हे देखील क्वॅारंटाईन आहेत.
भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या घरभरणीच्या कार्यक्रमात डॅा.हिना गावीत या उपस्थित होत्या. त्यामुळे ते देखील क्वॅारंटाईन आहेत.
एकुणच सर्वच पक्षांचे प्रमुख नेते कोरोनामुळे रुग्णालयात व होम क्वॅारंटाईन आहेत. पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी हे मंत्रालयीन कामासाठी मुंबईत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीतील कार्यकर्त्यांची मात्र नेत्यांशी प्रत्यक्ष भेट होणे अवघड झाले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशी राजकीय स्थिती निर्माण झाल्याने राजकीय वर्तुळात तो एक चर्चेचा विषय ठरला आहे.