‘बिटक्या’ने तिघांच्या मदतीने केलेली चोरी एलसीबीने केली उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 12:16 IST2020-06-16T12:16:39+5:302020-06-16T12:16:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एक लाखाचे बियाणे चोरी करणाऱ्या बिटक्या, चेला, मडरी व लखन यांना अटक करून त्यांच्याकडून ...

‘बिटक्या’ने तिघांच्या मदतीने केलेली चोरी एलसीबीने केली उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एक लाखाचे बियाणे चोरी करणाऱ्या बिटक्या, चेला, मडरी व लखन यांना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेला यश आले आहे. या तिघांकडून शहरातील आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अनिकेत उर्फ बिटक्या रवींद्र टिळंगे (२०), बाबा उर्फ लखन किशोर घासीकर (२७) व काल्या उर्फ चेला बिहारी गारुंगे (२२), मडरी ज्ञानदेव घासीकर रा.कंजरवाडा, नंदुरबार असे अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबारातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडावूनमध्ये विक्रीसाठी ठेवलेले १ लाख १६ हजार रुपये किंमतीचे हायब्रिड सिड लिमिटेड कंपनीचे कपासीचे बियाणे चोरीची घटना घडली होती. १ ते ४ जून दरम्यान ही घटना घडल्याचा अंदाज होता. चोरट्यांनी गोडावूनचे शटर उचकवून ही चोरी केली होती.
नंदुरबारात घडलेल्या या घटनेची पोलीस अधीक्षकांनी दखल घेवून एलसीबीला तपसाच्या सुचना दिल्या होत्या. एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांनी आपल्या खबरींमार्फत माहिती काढली असता कंजरवाड्यातीलच काही जणांनी ही चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास केला असता बिटक्या हा या चोरीचा मुळ सूत्रधार असल्याचे पुढे आले. किशोर नवले यांनी पथकातील काही जणांना साध्या वेशात वस्तीत पाठविले असता बिटक्या हा कंजरवाड्यातील गोडावूनच्या बाजुला असलेल्या पडक्या घराच्या जवळ बसलेला आढळला. त्याला घेरून ताब्यात घेतले. एलसीबीला नेले असता त्याने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली.
त्याने साथीदार मडरी ज्ञानदेव घासीकर, लखन घाशीकर, चेला गारुंगे यांच्यासोबत ही चोरी केल्याचे सांगितले. चोरलेला एक लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल मडरी घासीकर यांच्या घराच्या आडोशाला झाकुन लपवून ठेवलेला असल्याची माहिती दिली. त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी जाऊन पहाणी केली असता ९७ हजार १० रुपयांचा मुद्देमाल मिळाला.
पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून फरार झालेला मडरी घासीकर याला देखील लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले, पोलीस नाईक राकेश मोरे, अभय राजपूत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली.