प्रकाशा येथे १८ वर्षांवरील लसीकरण शिबिराचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:21 IST2021-06-25T04:21:58+5:302021-06-25T04:21:58+5:30
प्रकाशा : कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत केलेले नियोजन उत्कृष्ट असून, तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात ...

प्रकाशा येथे १८ वर्षांवरील लसीकरण शिबिराचा शुभारंभ
प्रकाशा : कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत केलेले नियोजन उत्कृष्ट असून, तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता सर्व सोयींयुक्त यंत्रणा उभी केली आहे. प्रकाशा गावाने कोरोनामुक्त गाव होण्याचा मान आधीच मिळवला आहे. असेच सहकार्य येणाऱ्या काळातही अपेक्षित असल्याचे १८ वर्षांवरील वयोगटासाठी आयोजित लसीकरण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. याबाबत असे की, प्रकाशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये १८ वर्षांवरील तरुणांसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन बुधवारी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील, केदारेश्वर मंदिर संस्थांचे अध्यक्ष रामचंद्र पाटील, शहादा प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, शहादा तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, सरपंच सुदाम ठाकरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र वळवी, गट शिक्षणाधिकारी उषा पेंढारकर, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तायडे, केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर, मंडळ अधिकारी मुकेश चव्हाण, ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील, तलाठी डी.एम. चौधरी आदींसह प्राचार्य, शिक्षक, आरोग्य सेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.
दरम्यान, तिसरी संभाव्य लाट पाहता सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी तोंडाला मास्क लावा, सामाजिक अंतर ठेवा व नियमित हात धुवा तसेच ज्यांचे लसीकरण बाकी आहे, त्यांनी लसीकरण करून घ्या. लसीकरणाबाबतीत धडगाव व मोलगी या तालुक्याकडे अधिक मेहनत घ्यावी लागेल, असे ही त्यांनी सांगितले. ज्यांनी लस घेतली आहे, त्यांनीही नियमित मास्क वापरायचा आहे. तसेच गर्दी टाळा असा संदेश त्यांनी याप्रसंगी दिला.
मुख्य कार्यकारी अधिकारी गावंडे यांनीही मनोगत व्यक्त केले. १८ वर्ष वयोगटावरील ३७६ तरुणांनी दिवसभरात लस टोचून घेतली. या शिबिरासाठी शहादा येथून आरोग्य विभागाचे कर्मचारी आले होते. यावेळी रजिस्ट्रेशनसाठी शिक्षकांनी मेहनत घेतली.
प्रास्ताविक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विवेक बाविस्कर यांनी केले. सूत्रसंचालन नरेंद्र गुरव तर आभार प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी मानले.
४५ वर्ष वयोगटावरील आठ हजार ५२२ लाभार्थी आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत पहिला डोस चार हजार ४३४ जणांनी घेतला आहे. तर दुसरा डोस ९४४ जणांना देण्यात आला. म्हणजे ५६ टक्के लसीकरण झाले आहे.