कै:या तोडल्याच्या रागातून पिंपळबारीला बालकाचे अपहरण करून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 17:08 IST2018-05-11T17:08:45+5:302018-05-11T17:08:45+5:30

कै:या तोडल्याच्या रागातून पिंपळबारीला बालकाचे अपहरण करून खून
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : झाडावरून कै:या तोडल्याच्या रागातून 12 वर्षीय बालकाचे अपहरण करून त्याचा खून केल्याची घटना पिपळाबारीचा माथेपाडा,ता.धडगाव शिवारात 7 मे रोजी घडली. याप्रकरणी आधी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मुलाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून एकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय रमेश ठाकरे (12) असे दुर्दैवी मयत बालकाचे नाव आहे. पिंपळाबारीचा माथेपाडा येथील रमेश जाण्या ठाकरे यांचा मुलगा अजय याने गाव शिवारातीलच कुंदन निज्या वळवी यांच्या शेतातील झाडावरील सहा कै:या तोडल्या होत्या. त्याचा राग येवून कुंदन वळवी याने अजय याचे अपहरण करून त्याला झाडाच्या सालने गळफास देवून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह पिंपळाबारी जंगलातील पातारी डोंगरावरील दरीत फेकून दिला. मुलाचा मृतदेह मिळून आल्यानंतर आधी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, नंतर त्याचे वडिल रमेश ठाकरे यांनी फिर्या दिल्याने कुंदन निज्या वळवी याच्याविरुद्ध धडगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक एस.बी.भामरे करीत आहे.