लक्कडकोट गावठाण प्रस्ताव आठ वर्षांपासून धूळ खात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST2021-06-10T04:21:29+5:302021-06-10T04:21:29+5:30
तळोदा : लक्कडकोट ग्रामस्थांच्या गावठाणचा प्रस्ताव गेल्या आठ वर्षांपासून धूळ खात पडला आहे. या प्रस्तावास तातडीने चालना द्यावी, ...

लक्कडकोट गावठाण प्रस्ताव आठ वर्षांपासून धूळ खात
तळोदा : लक्कडकोट ग्रामस्थांच्या गावठाणचा प्रस्ताव गेल्या आठ वर्षांपासून धूळ खात पडला आहे. या प्रस्तावास तातडीने चालना द्यावी, यासाठी गावकऱ्यांनी बुधवारी तहसीलदारांना साकडे घातले. सामूहिक वनहक्क दावे टाकून गावठाण प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.
तळोदा तालुक्यातील लक्कडकोट येथील ७० ते ८० कुटुंबे रोझवा लघुसिंचन प्रकल्पाजवळ सपाट असलेल्या जागेत राहतात. त्यांना गावात जागा उपलब्ध नसल्यामुळे ते तिथे नाइलाजास्तव राहत आहेत. यापूर्वी ही कुटुंबे आपल्या शेतात राहत होती. परंतु वाटणी हिस्सा व जागा कमी झाल्यामुळे गेल्या सात, आठ वर्षांपासून येथे राहायला आली आहेत. शासनाने या ठिकाणी गावठाण निर्माण करून सुविधा देण्याची मागणी सातत्याने केली आहे. यासाठी त्यांनी गावठाणचा प्रस्तावदेखील मंजुरीकरिता महसूल प्रशासनाकडे दाखल केला आहे. मात्र पुढील कार्यवाहीअभावी तो तसाच धूळ खात पडला आहे. बुधवारी या कुटुंबांनी तहसीलदार गिरीश वाखारे यांची भेट घेऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. वर्षानुवर्षे ग्रामस्थांची घरे ही स्वतःचा शेतातच होती; परंतु प्रत्येकाची कुटुंबसंख्या वाढल्याने शेतात घरेही वाढली. शेतात अधिक वस्त्यांमुळे जमीन कमी होऊन उदरनिर्वाह करण्याइतकेसुध्दा उत्पन्न होत नव्हते. म्हणून गेल्या आठ वर्षांपासून धरणाच्या पायथ्याशी नवीन वसाहत केली आहे.
यार गावठाणासाठी तेरा फाइल्स तयार करून गावठाणचा प्रस्ताव दिला आहे. अद्यापही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वीज, पाणी, आरोग्य सुविधा, शिक्षण, रस्ते, या मूलभूत सोयी करण्यास अडचणी येत आहे. लवकरात लवकर नवीन वसाहत येथे गावठाणसाठी मंजुरी मिळावी व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी गावकऱ्यांनी तहसीलदार यांना भेटून केली आहे. निवेदनावर राजेंद्र पाडवी, संजय पाडवी, सखाराम पाडवी, लक्ष्मण पाडवी, लालसिंग पाडवी, पवन पाडवी, जेना वळवी, जकमसिंग पाडवी, दिनेश वळवी, शंकर पाडवी, दिलीप पाडवी, बालसिंग वळवी आदींसह ३० ते ३५ ग्रामस्थांच्या सह्या आहेत.