वीजचोरट्यांना कंपनी देणार लाखो रुपयांच्या दंडात्मक कारवाईचा ‘शाॅक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:38 IST2021-09-16T04:38:39+5:302021-09-16T04:38:39+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात वीजचोरीचे प्रमाण वाढले असून, भरारी पथकांकडून दर महिन्याला वीजमीटर तपासणी करून कारवाई केली जात आहे. ...

वीजचोरट्यांना कंपनी देणार लाखो रुपयांच्या दंडात्मक कारवाईचा ‘शाॅक’
नंदुरबार : जिल्ह्यात वीजचोरीचे प्रमाण वाढले असून, भरारी पथकांकडून दर महिन्याला वीजमीटर तपासणी करून कारवाई केली जात आहे. यातून गेल्या दोन वर्षांत ४३० प्रकरणे कंपनीकडे दाखल झाली आहेत. यातून ८३ लाख रुपयांची वीजचोरी झाली आहे. या चोरट्यांवर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया तसेच दंड न भरल्यास फाैजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाईही सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
वीज कंपनीच्या पथकांकडून गेल्या दोन वर्षांत वीजमीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. महावितरणच्या शहादा आणि नंदुरबार अशा दोन्ही विभागांतील पथकांकडून कार्यवाही सुरु आहे. यातून वीजमीटरमध्ये फेरफार केल्याचे समोर आल्यानंतर मीटरची तातडीने तपासणी करुन त्याचा अहवाल तयार होत आहे. मीटरमध्ये फेरफार झाल्याचे स्पष्ट झाल्यास तातडीने वीजचोरी केलेल्या युनिटप्रमाणे बिलवसुलीची नोटीस बजावली आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क केला असता, कंपनीकडून धडक मोहीम वर्षभर सुरु राहणार असून वीज चोरट्यांवर कारवाईचे सत्र सुरू राहणार आहे. ग्राहकांनी योग्य पद्धतीने वीज वापरावी असे सांगितले.
जबरी दंड, अन्यथा फौजदारी गुन्हा
n वीजचोरी केलेल्या ग्राहकाने वीजचोरीचे अनुमानित बिल व दंडाची रक्कम भरल्यास त्याचा वीजपुरवठा सुरू ठेवला जातो. मात्र वीजचोरीचे बिल न भरल्यास ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला जातो.
दरम्यान दंडात्मक कारवाईंतर्गत मीटर रीडिंगची दुप्पट रक्कम द्यावी लागेल. वीजचोरीचा गुन्हा दाखल होतो.
जिल्ह्यात २०२० या वर्षात वीजचोरीचे तब्बल ३४० प्रकार समोर आले होते. एकूण ५५ लाख ५७ हजार रुपयांची वीजचोरी या काळात झाली होती. २०२१ या वर्षात ९७ केसेस दाखल असून २८ लाख पाच हजार रूपयांचा दंड केला गेला.
अशी केली जाते वीजचोरी
मीटरमध्ये फेरफार करून मीटरमध्ये गती कमी करणे, रिमोटच्या साह्याने मीटर बंद करणे, मीटर बायपास करणे, मीटर असतानाही आकडा टाकून वीजचोरी करणे अशा प्रकारे वीजचोरी केली जाते. महावितरण सर्व ग्राहकांच्या मासिक वीजवापराचे नियमित विश्लेषण करत असते. यात काही ग्राहकांचा वीजवापर कमी झाल्याचे आढळल्यास मीटरची तपासणी केली जाते.