कोचरा माता परिसर समस्यांचा विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:28 IST2021-08-01T04:28:03+5:302021-08-01T04:28:03+5:30
कोचरा, ता.शहादा येथे प्राचीन कोचरा मातेचे मंदिर आहे. नवसाला पावणारे देवस्थान म्हणून श्रद्धा असल्याने येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. ...

कोचरा माता परिसर समस्यांचा विळख्यात
कोचरा, ता.शहादा येथे प्राचीन कोचरा मातेचे मंदिर आहे. नवसाला पावणारे देवस्थान म्हणून श्रद्धा असल्याने येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. दर मंगळवारी व शुक्रवारी गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील भाविक नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. मात्र येथे सुविधा नसल्याने त्यांना समस्यांना सामोरे जात धार्मिक विधी पार पाडावे लागतात. नवस फेडण्यासाठी भाविक येथे स्वयंपाक करतात. त्यासाठी येथे स्वतंत्र शेड उभारले तर भाविकांची सोय होणार आहे. पाण्याच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र हातपंप असला तरी तेथे पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था नसल्याने घाणीचे प्रचंड साम्राज्य असते. जेवणानंतर तेथेच कागदी ग्लास व इतर साहित्य टाकले जात असल्याने अस्वच्छता होते. स्वयंपाक व जेवण झाल्यानंतर भाविक याठिकाणी भांडी व कपडे धुतात. परंतु नंतर साफसफाई केली जात नाही. याठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी बांधण्याची गरज आहे. काही भाविकांकडून होणारी घाण रोखण्यासाठी मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र व्यक्तीची नेमणूक करणे गरजेचे आहे. या घाणीमुळे मंदिर परिसरात अक्षरशः दुर्गंधी पसरते. याबाबत भाविकांनीही काळजी घेणे आवश्यक आहे.
मंदिराच्या काही अंतरावर होळकर कालीन जुनी पायविहीर आहे. या विहिरीच्या परिसरातही घाण असून दुरवस्था झाली आहे. मंदिरासमोर नाला असून तो सद्य:स्थितीत बंद आहे. मात्र त्यात साचलेल्या घाणीमुळे दुर्गंधी पसरते. मंदिरासमोर नारळ फोडण्यासाठी व्यवस्था आहे. तेथेही नेहमी घाण असते.
भक्तनिवास शोभेलाच
याठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी भक्तनिवास बांधण्यात आले आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून या भक्तनिवासाला पावसाळ्यात गळती लागत असल्याने त्याचा भाविकांना काहीही उपयोग होत नाही. या भक्त निवासची दुरुस्ती करून भाविकांना ते वापरासाठी उपलब्ध करुन देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मंदिर परिसरातील रस्त्याची दुर्दशा
कोचरा माता मंदिरावर बाराही महिने भाविकांची गर्दी असते. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सध्या पावसाळा सुरू आहे. गोगापूरकडून तसेच कोचरा गावाहून मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर नेहमीच चिखल असल्याने पायी येणाऱ्या भाविकांना चालणेही कठीण आहे. त्यामुळे या रस्त्याचे त्वरित नूतनीकरण करण्याची गरज आहे.
उघड्यावर प्रांतविधी करण्याची वेळ
कोचरा माता मंदिर हे संपूर्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये प्रसिद्ध आहे. याठिकाणी नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. याच ठिकाणी येणाऱ्या महिला भाविकांना ना मुतारी ना शौचालयाची सोय नसल्याने त्यामुळे त्यांची कुचंबणा होत आहे. केवळ प्रसाधनगृह नसल्याने त्यामुळे भाविकांना उघड्यावर प्रांतविधी करण्याची वेळ आली आहे.
सांस्कृतिक भवन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
कोचरा माता मंदिर परिसरात कोट्यवधी रुपये खर्च करून सांस्कृतिक भवन बांधण्यात आले आहे. परंतु काम पूर्ण होऊन दोन वर्षे लोटण्यात आले असून अद्यापही सांस्कृतिक भवन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.