कोरोनामुळे होतेय किडनीचे नुकसान; लक्षणांकडे लक्ष द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST2021-06-17T04:21:36+5:302021-06-17T04:21:36+5:30
नंदुरबार : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हाेणाऱ्या उपचारांत किडनीला हानी पोहोचत असल्याचे प्रकार समोर आले होते. यातून तशा प्रकारची ...

कोरोनामुळे होतेय किडनीचे नुकसान; लक्षणांकडे लक्ष द्या
नंदुरबार : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हाेणाऱ्या उपचारांत किडनीला हानी पोहोचत असल्याचे प्रकार समोर आले होते. यातून तशा प्रकारची लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध उपचार करायला हवेत, तसेच ज्यांना किडनीचा आजार आहे. अशा नागरिकांना लागण झाल्यास डायलिसीस करून उपचार दिले जात आहेत.
जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. एप्रिल व मे महिन्यांत मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त रुग्ण समोर येत होते. यात विविध दुर्धर आजार असलेले रुग्णही होते. या रुग्णांचे नियमित औषधोपचार सुरू ठेवत त्यांच्यावर कोरोना उपचार करण्यात आले होते. यातून बहुतांश रुग्ण हे बरे होऊन घरीही परतले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव केवळ किडनीवर होतो असा गैरसमज यातून वैद्यकीय तज्ञांनी खोडून दाखविला होता.
जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बहुतांश रुग्णांची मेडिकल हिस्टरी तपासून त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार दुर्धर आजार असलेले कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण हे ५० ते ६० टक्क्यांच्या मध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे.
किडनीचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास
किडनीचा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह येऊ शकतो.
रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी केवळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
अशा रुग्णांनी शरीराला प्रथिने, कर्बोदके आणि व्हिटमीन कसे मिळेल हे लक्षात घेणे आवश्यक आहे. अधिकाधिक पाणी पीत राहणेही या रुग्णांना लाभदायक ठरणार आहे.
कोरोना झाला असला तरी नियमित औषधे घेत राहणे आवश्यक आहे.
डाॅक्टरांकडून नियमित वैद्यकीय तपासणी करणेही आवश्यक आहे.
फॅमिली डॉक्टरांशी बोलूनच घ्या स्टेरॉईड
किडनीसंबंधी आजार असलेल्या रुग्णांनी कोरोनावर उपायकारक असलेले रेमडेसिविर किंवा तत्सम स्टेराॅईड औषधी हे फॅमिली डाॅक्टरच्या सल्ल्याने घेणे आवश्यक आहे.
तज्ञांनी सल्ला दिल्यानंतर ठरवून दिलेली मात्राच घ्यावी, त्याचा अतिरिक्त डोस घेऊ नये़
किडनी खराब असलेल्या नागरिकांनी कोरोनाची लक्षणे दिसल्यास आवश्यक ती तपासणी करून घेतली पाहिजे.
सातत्याने समाजमाध्यमांमध्ये कोरोना आणि किडनी विकार याविषयी देण्यात येणाऱ्या माहिती सत्यता तज्ञांच्या सल्ल्याने पडताळून पाहावी.
वेळोवेळी सॅनिटायझर आणि मास्कचा नियमित वापर करावा.
गर्दीमध्ये जाणे टाळावे, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून इतरांच्या संपर्कात यावे.
कोविड लसीकरण करून घेण्यास प्राधान्य द्यावे.
गर्दी न करणे, विवाह सोहळे व इतर समारंभात जाणे टाळावे.
तोंडाला एकदा मास्क लावल्यास वारंवार त्याला हात लावू नये. मास्क बदलून घ्यावा, हात नियमित धुतल्यास संसर्गाचा धोका कमी होतो.
एक किडनी असलेला, किंवा डायलिसिसवर असलेल्या रुग्णांची खास काळजी घेतली जाते. रुग्णालयात उपचार करण्याआधी त्यांचे मागील वैद्यकीय रेकाॅर्ड तपासून त्यांना कोरोनाचे उपचार केले जातात. नियमित डायलिसिसही होते.
-डॉ. के. डी. सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबार.