खरीप नियोजन आढाव्याला होणार यंदा कोरोनामुळे विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:31 IST2021-04-20T04:31:34+5:302021-04-20T04:31:34+5:30
दरवर्षी खरीप हंगाम नियोजनासाठी कृषी विभागाची एप्रिल महिन्यापासूनच तयारी सुरू होत असते. बियाणे, खते, किटकनाशके यांची मागणी नोंदविणे, त्याच्या ...

खरीप नियोजन आढाव्याला होणार यंदा कोरोनामुळे विलंब
दरवर्षी खरीप हंगाम नियोजनासाठी कृषी विभागाची एप्रिल महिन्यापासूनच तयारी सुरू होत असते. बियाणे, खते, किटकनाशके यांची मागणी नोंदविणे, त्याच्या उपलब्धतेबाबत आढावा घेणे, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कुठल्या पिकाचे क्षेत्र वाढू शकते किंवा घट होऊ शकते, याचा तज्ज्ञांमार्फत आढावा घेतला जातो, शिवाय बोगस बियाणे, खते यांच्यावर नियंत्रणासाठी पथके स्थापन करण्याचे नियोजन असते. जिल्ह्यात खरिपाचे लागवड क्षेत्र जवळपास अडीच लाख हेक्टर इतके आहे. त्यात सर्वाधिक अर्थात एक लाखापेक्षा अधिक क्षेत्रावर कापूस लागवड केली जाते. त्या खालोखाल सोयाबीन, मका व इतर पिकांचा समावेश असतो. त्यामुळे कापूस बियाणे मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची मे महिन्यातच धावपळ सुरू होते. कारण बहुतेक बागायतदार शेतकरी मे महिन्यातच कापूस लागवड करीत असतात. गेल्या वर्षी पावसाळा चांगला झाल्याने, अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी व कूपनलिकांनाही अद्यापही चांगले पाणी आहे. त्यामुळे बहुतेक शेतकरी यंदा मे महिन्यातच कापूस लागवडीवर भर देणार असल्याचे चित्र आहे. त्या दृष्टीने अशा शेतकऱ्यांना वेळेवर कापूस बियाणे उपलब्ध करून देणे कृषी विभागाचे प्रथम कर्तव्य ठरणार आहे. असे असले, तरी यंदा गेल्या वर्षाप्रमाणेच कोरोनाची स्थिती भयावह रूप धारून करून बसली आहे. त्यामुळे कृषी विभागाचे खरिपाचे नियोजन करतांना मोठी कसरत ठरणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर साधारणत: मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हास्तरीय खरीप नियोजन आढावा बैठक पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होण्याची शक्यता आहे. कारण मेच्या दुसऱ्या आठवड्यात विभागीय आणि तिसऱ्या आठवड्यात राज्याची बैठक घ्यावी लागत असते, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.