दुर्गम भागातील प्रश्नांवरुन जि़प़च्या सभेत खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 11:45 IST2019-05-03T11:45:27+5:302019-05-03T11:45:46+5:30
स्थायीची सभा : ग्रामसेवकाच्या गैरहजेरीच्या तक्रारी

दुर्गम भागातील प्रश्नांवरुन जि़प़च्या सभेत खडाजंगी
नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागातील गावांच्या समस्यांवरुन जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सदस्य आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली़ रोषमाळ खुर्द आणि तीनसमाळ ता़ धडगाव येथील प्रश्नांवरुन सदस्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यानंतर योग्य ते उत्तर न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत होती़
जिल्हा परिषदेच्या सभागृहात गुरुवारी दुपारी ही सभा आयोजित करण्यात आली होती़ अध्यक्षस्थानी अध्यक्षा रजनी नाईक होत्या़ यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष सुहास नाईक, बांधकाम सभापती दत्तू चौरे, आरोग्य सभापती हिराबाई पाडवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी उपस्थित होते़ प्रारंभी प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे यांनी सभेचे विषयवाचन केले़ प्रारंभी गडचिरोली येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली़ सभेत सदस्य रतन पाडवी यांनी तिनसमाळ येथे १ वर्षापासून कूपनलिका खोदून ठेवल्या असल्या तरी साहित्य बसवले गेलेले नसल्याचे सांगितले़ अधिकाºयांनी संबधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली़ यावर उत्तर देताना पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पी़टी़बडगुजर यांनी दुर्गम भागात ४० पैकी १६ कामे अपूर्ण असल्याची माहिती दिली़ संबधित ठेकेदार यांच्याकडून आठ दिवसात उर्वरित कामे करुन घेणार असल्याचे तसेच गौºयाचा बोदलापाडा आणि कुंडलचा गुगलमालपाडा येथे २६ एप्रिलपासून १ दिवसआड टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याची व तीनसमाळ येथे सोलरबेस योजनेतू मंजूरी मिळाल्याची माहिती दिली़
दरम्यान रतन पाडवी यांनी तीनसमाळ येथे रस्ता अपूर्ण असल्याने बोअरची गाडी जाऊ शकत नसल्याची माहिती दिल्यानंतर उपस्थित अधिकारी उत्तर देऊ शकले नाहीत़
सभेत पशुसंवर्धन विभाग २१ एप्रिलपासून लाडीखुर्गट प्रतिबंधक लसीकरण सुरु असल्याची माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ उमेश पाटील यांनी दिली़ सभेत विविध ९ विषयांवर चर्चा करण्यात आली होती़ सभेत धडगाव तालुक्यातील रोषमाळ खुर्द ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक गैरहजर राहण्याचा मुद्दा सदस्यांनी उचलून धरला होता़ याठिकाणी नियुक्त असलेले ग्रामविकास अधिकारी डी़डी़पाटील हे निधी खर्च करताना टाळाटाळ करणे, १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च न करणे, पेसा व इतर निधी मधून विकास कामे न करणे, तसेच नर्मदा काठावरच्या २० गावांमध्ये पाणीटंचाई असतानाही उपाययोजना करत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या़ सदस्य रतन पाडवी यांनी याबाबत रोषमाळच्या ग्रामस्थांनी दिलेले निवदेन घेऊन आले होते़ त्यांनी निवेदन उपस्थित अधिकाºयांसमोर ठेवतच प्रश्न मांडला़ संबधित ग्रामविकास अधिकारी हे १८ आॅगस्ट २०१८ पासून रजेवर असल्याने त्यांनी अतिरिक्त कार्यभार असलेल्या ग्रामविकास अधिकारी यांच्याकडेही पदभार सोपवलेला नसल्याने नाराजी व्यक्त केली़ यावर उत्तर देताना ग्रामविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे यांंनी डी़डी़पाटील यांच्या दप्तर व रोषमाळ खुर्द येथील कामाची तपासणी करण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देणार असल्याची माहिती दिली़