रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार सुरू असतानाच नंदुरबार जिल्ह्यातही खडसे समर्थकांची बंदद्वार चर्चा झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे. दरम्यान, या बैठकीत काय चर्चा झाली याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नवीन रणनीती बाबतही चर्चा चरू झाली आहे.भाजपचे नेते खडसे यांचे नंदुरबार जिल्ह्याशी नातेसोयरेचे संबंध आहेत. तीन दशकांपासून त्यांनी या भागातही भाजपचे कार्यकर्ते जोडले आहेत. त्यामुळे साहजिकच जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा वैयक्तिक प्रभाव आहे. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची चर्चा सुरू झाली तेव्हापासून जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांकडेही लक्ष होते. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी त्यांच्या समर्थकांची तळोद्यात बंदद्वार चर्चा झाली. ही चर्चा प्रदीर्घ होती. त्यासंदर्भात पूर्णपणे गोपनीयता बाळगण्यात आल्याने त्याबाबतचे अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नाही. परंतु उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये बहुतांश कार्यकर्ते भाजपमध्ये पक्षांतर्गत नाराज आहेत. त्याबाबत यापूर्वीही त्यांनी उघडपणे ही नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे गुरुवारीच भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने प्रदेश अध्यक्षांकडे जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत वादाचे पाठवलेले पत्र जाहीर केले आहे. त्यामुळे तळोद्यातील या बैठकीला वेगळे महत्त्व आले आहे. उपस्थित नेते पक्षांतराच्या कुठलाही निर्णय नसल्याचे सांगत असले तरी काही तरी पक्षात शिजत असल्याचे स्पष्ट आहे.राष्ट्रवादीही अलर्टएकीकडे खडसे समर्थकांची बैठक सुरू असताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हेदेखील अंतर्गत पक्ष बांधणीच्या तयारीत अधिक सक्रीय झाल्याचे दिसले. गुरुवारी ते तातडीने मुंबईला गेले असून राष्ट्रवादीत कार्यकर्त्यांचा प्रवेशाचे मुहूर्त ठरल्यास त्याचे जिल्ह्यातील राष्ट्रवादीतील बांधणीचे समीकरण कसे असेल याच्या मार्गदर्शनासाठी ते वरिष्ठ नेत्यांकडे गेल्याचे समजते.
आपण ४० वर्षांपासून भाजपचे सक्रीय कार्यकर्ते असून आजवर पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे. यापुढेही याच पक्षात आपण काम करणार असल्याने पक्ष सोडण्याचा प्रश्नच नाही. आजची बैठक पक्षांतर्गत चर्चा करण्यासाठी झाली. जुने कार्यकर्ते एकत्र आले होते. प्रत्येकाने आपापल्या मनातील काही भावना व अनुभव मांडले. एकनाथराव खडसे यांच्याशी वैयक्तिक संबंध आहेच. पण ते संबंध राजकारणापलिकडचे आहेत. पक्षीय काम वेगळे आहे. त्यामुळे आपण भाजप सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.-डॅा.शशिकांत वाणी,भाजप प्रदेश सदस्य.
भाजपच्या अंतर्गत कामकाजाबाबत चर्चा करण्यासाठी आज जुने कार्यकर्ते एकत्र आले होते. मी आणि डॅा.शशिकांत वाणी आम्ही दोघे जण यापूर्वी पक्षाचे जिल्हाध्यक्ष होतो. तेव्हाचे कामकाज व आताचे कामकाज याबाबत कार्यकर्त्यांच्या विचारांची देवाण-घेवाण झाली. त्यासोबतच नवीन बुथ प्रमुखसंदर्भात चर्चा झाली. मी मूळ भाजपवासी आहे. माझे वडील देखील भाजपमध्येच एकनिष्ठ होते. त्यामुळे पक्ष सोडण्याबाबत कुठलीही चर्चा बैठकीत झाली नाही.-नागेश पाडवी,प्रदेश उपाध्यक्ष, भाजप आदिवासी आघाडी.