कानुबाई माता उत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:36 IST2021-08-18T04:36:22+5:302021-08-18T04:36:22+5:30
श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवारी कानुबाई मातेची स्थापना केली जाते. सोमवारी मिरवणुका काढून उत्सवाचा समारोप झाला. शहादा येथे खान्देशचे ...

कानुबाई माता उत्सव साजरा
श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवारी कानुबाई मातेची स्थापना केली जाते. सोमवारी मिरवणुका काढून उत्सवाचा समारोप झाला.
शहादा येथे खान्देशचे कुलदैवत कानुबाई मातेचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर निर्बंध शिथिल झाल्याने हा उत्सव साजरा करण्यात आला. रविवारी कानुबाई मातेची स्थापना करण्यात आली. रात्रभर जागरण केल्यानंतर सोमवारी मिरवणुका काढून उत्सवाचा समारोप झाला. प्रकाशा येथील तापी नदीपात्रात विसर्जन करण्यात आले. या उत्सवामुळे कौटुंबीक एकता निर्माण होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंब या उत्सवात सहभाग होते.
महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या खेतिया येथेही कानुबाई उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. रविवारी कानुबाई मातेची स्थापना झाल्यानंतर कुटुंबातील सर्वांनी एकत्र येत नैवेद्य बनविला. पुरणपोळी व खीर नैवेद्य मातेला देऊन रात्रभर कानुबाईची गाणी, भजन-कीर्तन करून जागरण करण्यात आले. सोमवारी सकाळी मिरवणुका काढून कानुबाई मातेला निरोप देण्यात आला. मिरवणुकीत नृत्य, भजन, कीर्तन, गरबा, फुगडी नृत्य करून भक्तीभावाने निरोप देण्यात आला.
बोरद परिसर
भाऊबंदकीतील रूसवे-फुगवे दूर करून कुटुंबांना एकत्र आणणारा कानुबाई माता उत्सव तळोदा तालुक्यातील बोरद व मोड परिसरात यंदा उत्साहाने साजरा करण्यात आला. गावागावात रविवारी कानुबाई मातेची स्थापना करण्यात आली. यानिमित्त कुटुंबातील सर्वांनी एकत्र येत मातेला नैवेद्य दिला. रात्री भजन-कीर्तन, गाणी म्हणून जागरण करण्यात आले. सोमवारी मिरवणुकीद्वारे कानुबाई मातेला निरोप देण्यात आला.