नंदुरबारात जुलै महिन्यात झाला २० बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 12:33 IST2020-07-28T12:31:35+5:302020-07-28T12:33:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जुलै महिन्यात कोरोनामुळे तब्बल २० जणांचा मृत्यू झाला आहे. २ जुलैपर्यंत मृत्यूसंख्या अवघी पाच ...

In July, 20 victims died | नंदुरबारात जुलै महिन्यात झाला २० बाधितांचा मृत्यू

नंदुरबारात जुलै महिन्यात झाला २० बाधितांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जुलै महिन्यात कोरोनामुळे तब्बल २० जणांचा मृत्यू झाला आहे. २ जुलैपर्यंत मृत्यूसंख्या अवघी पाच होती. तीच २६ जुलैपर्यंत २५ वर पोहचली आहे. त्यामुळे दीड दिवसात सरासरी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे चित्र आहे. मृत्यूचे प्रमाण अचानक वाढल्याने आता जिल्हा प्रशासनही हादरले आहे. ही आकडेवारी केवळ पॉझिटिव्ह असणाऱ्यांची आहे. लक्षणे असलेल्या मृतांची संख्या वेगळी आहे.
जिल्हा रुग्णालय आणि आरोग्य विभागावर पडणारा ताण लक्षात घेता खाजगी वैद्यकीय व्यावसायीकांना आवाहन केले जात आहे. दरम्यान, कोरोनाची लक्षणे दिसूनही उपचारासाठी उशीर करण्याच्या प्रकारामुळे मृत्यूसंख्या वाढत असल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढणे आणि त्याचबरोबर मृत्यूसंख्याही वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. महिनाभरात दररोज सरासरी किमान एका बाधीताचा मृत्यू होत असतांनाही आवश्यक असलेले इंजेक्शन स्थानिक स्तरावर उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे.
वाढणारे रुग्ण आणि वाढणारे मृत्यू यावर आता जिल्हा प्रशासन कसे नियंत्रण आणते याकडे लक्ष लागून आहे.
पाच वरून २५ वर
जिल्ह्यात कोरोनाने होणारे मृत्यू महिनाभरात अचानक वाढले आहेत. जून अखेर जिल्ह्यात केवळ पाच जणांचे मृत्यू झाले होते. जुलै महिन्याच्या ३ जुलै पासून पुन्हा मृत्यू सत्र सुरू झाले. ते आजअखेर सुरूच आहे. आकडा पाच वरून थेट २४ वर पोहचला आहे. एका दिवसात कधी एक तर कधी तीन जणांचे मृत्यू झाले आहेत. २६ दिवसात २० जणांचे झालेले मृत्यू ही चिंतेची बाब आहे. मृत्यू वाढण्याचे विविध कारणे सांगितली जात असली तरी नातेवाईकांमध्ये आणि एकुण जिल्हावासीयांमध्येही रोष व्यक्त केला जात आहे.
वयोगट ४० ते ७५
कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा वयोगट हा ४० ते ७५ इतका आहे. यातील ८० टक्के मृत्यू हे ६० ते ७५ वयोगटातील, १५ टक्के मृत्यू हे ४० ते ६० वयोगटातील आणि पाच टक्के मृत्यू हे ३० ते ५० वयोगटातील असल्याचे सूत्रांनी सांगितले. याचा अर्थ वयोवृद्धांची मृत्यूसंख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. यातील काहींना आधीचेच आजार होते. त्यात त्यांना कोरोना झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
सर्वाधिक नंदुरबार तालुक्यात
सर्वाधिक मृत्यू हे नंदुरबार तालुक्यात झाले आहेत. त्या खालोखाल शहादा व नवापूर तालुक्यांचा समावेश आहे. तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात एकाही मृत्यूची नोंद शासकीय रेकॉर्डवर नसल्याचे चित्र आहे. नंदुरबार तालुक्यात १६, शहादा तालुक्यात सात तर नवापूर तालुक्यात दोन जणांचा समावेश आहे. याशिवाळ लक्षणे असलेली व कोविड-१९ नुसार अंत्यविधी केलेल्या मृत्यूंची संख्या वेगळी आहे.
उशीरा दाखल होणे
कोरोनाची लक्षणे दिसून येत असतांनाही उपचारासाठी चालढकल करणे, उशीराने उपचारासाठी दाखल होणे या प्रकारामुळे मृत्यूसंख्या वाढत असल्याचे जिल्हा रुग्णालय सूत्रांचे म्हणने आहे. दुसरीकडे स्वॅब तपासणीत होणारा उशीर हे देखील कारण आहे.
स्वॅब घेतल्या गेल्यानंतर किमान ४८ तासात अहवाल येणे आवश्यक असतांना चार ते पाच दिवस अहवाल येतच नाही. तोपर्यंत संबधीत व्यक्तीच्या लक्षणांमध्ये वाढ होऊन त्याची प्रकृती खालावते.
अशा वेळी त्याला उपचारासाठी दाखल केल्यावर उपचाराला प्रतिसाद न देणे यासह इतर कारणांमुळे अशा रुग्णाचा मृत्यू ओढावतो. त्यामुळे प्राथमिक लक्षणे आढळताच लागलीच तपासणी करून घेणे व उपचार घेणे आवश्यक आहे. तरच मृत्यू संख्या कमी होऊ शकणार आहे.

सोमवारी आणखी तीन संशयीतांचा मृृत्यू झाला. त्यांना रविवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या स्वॅब अहवालाची प्रतिक्षा आहे. तर रात्री आठ वाजता एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.
तीन पैकी दोन रुग्णांचा कोविड कक्षात मृत्यू झाल्याची माहिती आहे. यापैकी एकाचा मृत्यू मध्यरात्री झाला होता. त्यांचा मृतदेह सकाळपर्यंत त्याच बेडवर पडून होता. त्यामुळे शेजारच्या इतर रुग्णांना त्रास सहन करावा लागल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांनी केल्या आहेत.
त्यामुळे मृत्यू झाल्यानंतर किमान मृतदेह तेथून इतरत्र हलविण्यात यावा. जेणेकरून शेजारच्या इतर रुग्णांना त्रास होणार नाही अशी अपेक्षा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

 

Web Title: In July, 20 victims died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.