लोणखेड्यात सराफा दुकान फोडून लाखोंच्या दागीण्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 20:27 IST2019-04-01T20:27:31+5:302019-04-01T20:27:51+5:30
मंदाणे : शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील चार रस्त्यावरील रामदेवजी ज्वेलर्स या सोने-चांदीच्या दुकानाच्या शटरचे लॉक अज्ञात चोरट्यांनी तोडून दीड ...

लोणखेड्यात सराफा दुकान फोडून लाखोंच्या दागीण्यांची चोरी
मंदाणे : शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील चार रस्त्यावरील रामदेवजी ज्वेलर्स या सोने-चांदीच्या दुकानाच्या शटरचे लॉक अज्ञात चोरट्यांनी तोडून दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. अत्यंत रहदारीच्या ठिकाणी झालेल्या या धाडसी चोरीमुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, लोणखेडा चार रस्त्यावरील फ्रेंड प्लाझा या इमारतीत पंकज सुरजमल जैन यांचे रामदेवजी ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान गेल्या तीन वर्षापासून थाटले आहे. या दुकानात ३१ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे सेंटर लॉक तोडून प्रवेश करीत दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली. सकाळी दुकानाचे शटर तुटल्याचे निदर्शनास आल्यावर दुकान मालक पंकज जैन यांनी दुकानाकडे धाव घेतली. दुकानात मालाची चौकशी केली असता मोठी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ पोलीसांना घटनेची माहिती दिली. या वेळी पोलीस निरीक्षक संजय शुक्ल, सहायक पोलीस निरीक्षक बापू शिंदे हे सहकाऱ्यांसह घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते. मात्र नेमका चोरट्याचा माग काढता आला नाही. चोरटे हे चारचाकी वाहनाने आले असावेत, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
पोलिसांनी पंचनामा केला असता त्यात ९० हजार रुपये किमतीचे ३० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या १७० कर्ण फुले व नाक फुल्या, आठ हजार ८०० रुपये किमतीच्या २० ग्रॅम चांदीच्या आठ बांगड्या, २८ हजार रुपये किमतीचे ७०० ग्रॅम, चांदीचे सात कंबर पट्टा, १४ हजार ८०० रुपये किमतीचे ३७० ग्रॅम वजनाचे चांदीचे आरती व दिवा, १४ हजार रुपये किमतीचे ३५० ग्रॅम वजनाचे चांदीचे आठ ग्लास, असा एकूण एक लाख ५५ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
या धाडसी चोरी प्रकरणी रामदेवजी ज्वेलर्सचे मालक पंकज सुरजमल जैन यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. प्रिदर्शनी थोरात करीत आहे.