तापीवरील उपसा सिंचन योजना दुरुस्तीसाठी २२ जणांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:09 IST2021-02-05T08:09:39+5:302021-02-05T08:09:39+5:30
नंदुरबार : तापीवरील २२ उपसा सिंचन योजनांच्या दुरुस्तीच्या कामाला वेग द्यावा व पूर्ण क्षमतेने कार्यान्वित कराव्या या मागणीसाठी संघर्ष ...

तापीवरील उपसा सिंचन योजना दुरुस्तीसाठी २२ जणांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन
नंदुरबार : तापीवरील २२ उपसा सिंचन योजनांच्या दुरुस्तीच्या कामाला वेग द्यावा व पूर्ण क्षमतेने कार्यान्वित कराव्या या मागणीसाठी संघर्ष समितीच्या वतीने १ फेब्रुवारी रोजी १२ जण प्रकाशा बॅरेजजवळ जलसमाधी घेणार आहेत. शासन, प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन, मागणी करून, आंदोलन करूनही याबाबत दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केले जात असल्याचे संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तापीवरील २२ उपसा जलसिंचन योजनेच्या दुरुस्तीचा प्रश्न रेंगाळला आहे. दोन्ही बॅरेजमध्ये पाणी असूनही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत आहे. परंतु निधीचा प्रश्न आणि इतर कारणांमुळे अद्यापही दुरुस्तीचे काम पूर्ण होऊ शकले नाही. याबाबत संघर्ष समितीने प्रशासनाला याबाबत ३१ जानेवारीपर्यंत अल्टिमेटम दिला होता. परंतु तरीही कार्यवाही न झाल्याने १ फेब्रुवारी रोजी जलसमाधी घेण्याचा निर्णय १२ जणांनी घेतला आहे.
जलसमाधी घेणाऱ्यांमध्ये समितीचे अध्यक्ष दीपक पुरुषोत्तम पाटील (लोणखेडा) यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष जिजाबराव गोरख पाटील (धमाणे), विजय महेंद्रलाल गुजराथी (कोपर्ली), यशवंत लिमजी पाटील(कहाटूळ), राजाराम दगडू पाटील (कहाटूळ), रवींद्र उत्तम पाटील (कहाटूळ), संजय लक्ष्मण पाटील (शिरुड), रितेश खेमराज बोरसे (कळंबू), विनोद चिंतामण पाटील (पुसनद), राजाराम सखाराम चौधरी(लहान शहादे), यशवंत जगन्नाथ पाटील (लहान शहादे), रवींद्र शंकर पाटील(शिंदे) व राजेंद्र विलास पाटील (खोडसगाव) यांचा त्यात समावेश आहे.
या आंदोलनाला उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेनेही पाठिंबा दिला आहे. लहान शहादे येथे मुकेश राजाराम चौधरी, रवींद्र शंकर पाटील, वसंत तुंबा पाटील, काशीनाथ नारायण पाटील, उद्धव दशरथ चौधरी, दगडू पाटील आणि संदीप मगन चौधरी यांचेकडे लहान शहादे येथे निवेदन देण्यात आले. यावेळी उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेचे कार्यवाह एन.एम. भामरे डॉ.एच.एम. पाटील उपस्थित होते.
पोलीस बंदोबस्तात वाढ
प्रकाशा बॅरेज स्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली दहा अधिकारी व दीडशे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय आपत्ती व्यवस्थापनचे ४० कर्मचारी, पट्टीचे पोहणारे स्थानिक २० जण यांचा त्यात समावेश आहे.