कुणी लस देता का लस म्हणायची आली वेळ, अनेक केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:22 IST2021-07-01T04:22:07+5:302021-07-01T04:22:07+5:30
नंदुरबार : ‘कुणी लस देता का लस...’ असे म्हणायची वेळ जिल्हावासीयांवर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून लसींचा ...

कुणी लस देता का लस म्हणायची आली वेळ, अनेक केंद्र बंद
नंदुरबार : ‘कुणी लस देता का लस...’ असे म्हणायची वेळ जिल्हावासीयांवर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून लसींचा तुटवडा सुरू असून अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रात फिरून लस आहे का हे शोधावे लागत आहे. आणखी दोन दिवस ही स्थिती राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोव्हॅक्सिन केवळ दुसऱ्या डोससाठी राखून ठेवण्यात आली होती. परंतु दुसरा डोस थांबवून आता कोव्हॅक्सिनचा पहिला डोस गुरुवारपासून सुरू होणार आहे. या लसीचे साधारण सात हजार डोस शिल्लक आहेत.
१८ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्यांचे २१ जून पासून लसीकरण सुरू करण्यात आल्यानंतर लसीकरणाचे प्रमाण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे लसींचा तुटवडा जाणवू लागला असून वरिष्ठ पातळीवरूनदेखील लस पुरविण्यात येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्र दोन दिवसांपासून बंद ठेवावे लागत आहे. परिणामी नागरिकांची फिरफिर होत असून लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात एकूण ९३ लसीकरण केंद्र आहेत. यातील ७० टक्के केंद्रांवर कोविशिल्ड लसींचा पुरवठा केला जातो. तर ३० टक्के केंद्रावर कोव्हॅक्सिनचा पुरवठा होतो. सध्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारचे लसीकरण सुरू आहे. त्यातच १८ वर्षे वयापेक्षा अधिक वय असलेल्यांचेही लसीकरण केले जात असल्याने प्रमाण वाढले आहे. त्याचा परिणाम लसींच्या तुटवड्यावर होत आहे.
लसीकरण केंद्र बंद
कोविशिल्ड लसच उपलब्ध नसल्याने नंदुरबार, शहादा, नवापूरसह अनेक भागातील लसीकरण केंद्र बंद झाले आहेत. कर्मचारी केंद्रावर येऊन बसतात, परंतु लसच नसल्याने लसीकरण करू शकत नाही. येथे येणारे नागरिक लसीकरणाची मागणी करतात, परंतु कर्मचारी हतबल असतात. यातून नागरिक आणि कर्मचारी यांच्यात वादविवाद होत असल्याचे चित्र आहे. केंद्राच्या बाहेर लस उपलब्ध नसल्याचे फलक लावलेले असले तरीही नागरिक कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत असल्याचे चित्र आहे.
आणखी दोन दिवस प्रतीक्षा
लसीकरणासाठी आणखी दोन दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. कोविशिल्डचे सात हजार डोस शुक्रवारी किंवा शनिवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते डोस जिल्ह्यातील केंद्रांवर वितरित केले जाणार आहेत. या सर्व प्रक्रियेला दोन दिवस लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तोपर्यंत नागरिकांची फिरफिर होणार आहे.
कोव्हॅक्सिन देणार
ज्या केंद्रांवर कोव्हॅक्सिन दिले जाते त्याच केंद्रांवर गुरुवारपासून या लसीचा पहिला डोसही दिला जाणार आहे. त्यासाठी दुसऱ्या डोस वाल्यांना काही दिवस थांबावे लागणार आहे. राज्य पातळीवरूनच दुसऱ्या डोससंदर्भात तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर जाऊ नये असेही सूत्रांनी सांगितले. साधारणत: सात हजार डोस या लसीचे उपलब्ध असून त्यातून बऱ्यापैकी सोय होणार असल्याचे चित्र आहे.
दुर्गम भागात धाव
दुर्गम भागात वितरित करण्यात आलेल्या कोविशिल्ड लसींचा डोस अनेक केंद्रांवर शिल्लक आहेत. तेथे लसीकरण सुरळीत आहे. परंतु लस घेणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. अशा ठिकाणी आता अनेकांनी धाव घेण्यास सुरुवात केली आहे. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील लसीकरण केंद्रांवर शहादा, नंदुरबार तालुक्यातील अनेक नागरिक लस घेण्यासाठी जात असल्याचेही चित्र आहे.