मंत्रीमहोदय तयारीनिशी आले असते तर बरे झाले असते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:29 IST2021-02-07T04:29:38+5:302021-02-07T04:29:38+5:30
नंदुरबार -राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व क्रीडामंत्री सुनील केदार यांनी नुकतीच नंदुरबार जिल्ह्यातील अंबाबारी येथे शेतकरी आंदोलनातील शहीद महिला सीताबाई ...

मंत्रीमहोदय तयारीनिशी आले असते तर बरे झाले असते
नंदुरबार -राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व क्रीडामंत्री सुनील केदार यांनी नुकतीच नंदुरबार जिल्ह्यातील अंबाबारी येथे शेतकरी आंदोलनातील शहीद महिला सीताबाई तडवी यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी भेट दिली. सीताबाईंच्या कृतार्थ जीवनाचा सन्मान करण्यासाठी त्यांनी घेतलेली दखल निश्चितच समाधानकारक आहे. पण त्यांचा हा दौरा पूर्ण तयारीनिशी झाला असता तर तो अनेक अर्थाने फलदायी ठरला असता. दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात लोकसंघर्ष मोर्चातर्फे अंबाबारी, ता.अक्कलकुवा येथील सीताबाई तडवी यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला. त्याची दखल घेऊन त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी मंत्री सुनील केदार आले होते. अतिशय खडतर प्रवास वाहनाने करीत ते अंबाबारी येथे पोहोचले. तेथे गेल्यानंतर सीताबाईच्या कार्याचा त्यांनी खऱ्या अर्थाने सन्मान केला. ती निश्चितच जिल्हावासीयांसाठी कौतुकाची बाब होती. मात्र त्यांचा हा दौरा अचानक ठरला की काय अशीच स्थिती होती. कारण सीताबाईच्या कुटुंबीयांना त्यांना वैयक्तिक मदत करायची होती. तीदेखील त्यांनी कार्यकर्त्यांकडे बोलून नंतर पाठवणार असल्याचे सांगितले. त्यांचा जिल्ह्यात दौरा होत असताना आठवडाभरापासून जिल्ह्यातील नवापूर येथे कोंबड्यांचा मृत्यूच्या घटना घडत असल्याने पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. त्यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच जिल्हा प्रशासनाने नवापूर व परिसरात बर्ड फ्लूबाबत उपाययोजना म्हणून प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित केले होते. त्यामुळे या बाबीची कल्पना त्यांना होती की नाही हा विषय वेगळा असला तरी जर त्यांनी त्यासंदर्भात प्रशासनाची बैठक घेऊन त्यांचे मनोबल वाढवले असते तर आणि पोल्ट्री व्यावसायिकांनाही शासनाकडून दिलासा दिला असता तर निश्चितच त्यांच्याही वेदना काहीशा हलक्या झाल्या असत्या.
मंत्रीमहोदयांकडे युवक कल्याण व क्रीडा हे खातेही आहे. जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलांची अवस्था वाईट आहे. शासनाने यासाठी निधी दिला असला तरी अनेक ठिकाणी अजूनही काम सुरू झालेले नाही. जिल्हा क्रीडा संकुलाची अवस्थाही फारशी समाधानकारक नाही. तेथील जलतरण तलाव अजूनही सुरू होऊ शकलेला नाही. जिल्ह्यातीलच आदिवासी दुर्गम भागातील युवक अनिल वसावे याने नुकतेच प्रजासत्ताकदिनी अफ्रिकेतील सर्वात उंच किलीमांजारो हे शिखर सर करून तेथे तिरंगा ध्वज फडकविला. हा गिर्यारोहक नुकताच परतला आहे. या आदिवासी गिर्यारोहकाचा सन्मान करून त्याचेही मनोबल वाढवले असते तर निश्चितच त्याच्या भविष्याच्या कामगिरीला प्रोत्साहन मिळाले असते.
अर्थातच या साऱ्या बाबी यासाठी की नंदुरबार जिल्हा आधीच उपेेक्षित जिल्हा आहे. याच जिल्ह्यात मंत्र्यांचा दौरा तसे दुर्मिळ बाब. अशा स्थितीत एखाद्या मंत्र्याचा दौरा आला की जिल्ह्यातील जनतेच्या अपेक्षा उंचावतात. त्यामुळे पशुसंवर्धन व क्रीडामंत्री यांचा दौरा आता पुढे कधी होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे त्यांचा हा दौरा जर नियोजनपूर्वक केला असता तर जिल्ह्यातील अनेक प्रश्नांना चालना मिळू शकली असती. सीताबाईच्या कार्याचा सन्मान त्यांच्या तोंडून होणे हे निश्चितच सातपुड्यातील जनतेसाठी अभिमानास्पद बाब आहे. सीताबाईंनी आपले आयुष्य गरिबांच्या न्याय हक्कासाठी चळवळ व आंदोलनासाठी घालवले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पशुसंवर्धनमंत्र्यांनी त्याची दखल घेतली हे निश्चितच गरीब, आदिवासी, शोषित जनतेसाठी लढणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्यांना बळ देणारे ठरले आहे.