११ वीच्या प्रवेशासाठी गुणवत्तेची कस लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:03 IST2020-08-06T13:03:11+5:302020-08-06T13:03:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेत नाशिक ...

११ वीच्या प्रवेशासाठी गुणवत्तेची कस लागणार
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेत नाशिक विभागात ९३.७३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात १६.१५ टक्के वाढ झाली आहे. तसेच सीबीएसई आणि आयसीएसईचा निकालही ९५ टक्यांचा पार लागल्याने यंदा नामांकित कॉलेजमध्ये प्रवेशासाठी चांगलीच चुरस पाहावयास मिळणार आहे.
यंदा शहादा तालुक्यातील नामांकित महाविद्यालयात ११ वी प्रवेशासाठी एक हजार ६०० च्या सुमारास जागा आहेत आणि दहावीत त्याहून जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे वरिष्ठ स्तरावर याची माहिती देत तुकड्या वाढविण्याची मागणी करावी लागणार असल्याचे एका महाविद्यालयातील प्राचार्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना अपेक्षित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणे हे आव्हानच ठरणार आहे.
दरवर्षी १० वीचा निकाल जूनमध्ये जाहीर होतो. यंदा करोना व लॉकडाऊनमुळे निकालाला दीड महिन्याहून अधिक काळ विलंब झाला. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भूगोलाचा शेवटचा पेपर रद्द करावा लागला. त्यामुळे इतर विषयांच्या सरासरीने या विषयात गुण दिले गेले.
इयत्ता १० वीच्या निकालात आणि गुणांचा टक्का चांगलाच वाढल्याने विद्यार्थ्यांना आता ११ वीत आपल्या आवडीचे महाविद्यालय मिळवण्यासाठी स्पर्धा करावी लागणार आहे. निकाल चांगला लागल्याने यंदाचा कट आॅफदेखील १० ते १५ टक्यांनी वाढण्याची शक्यता आहे. तसेच प्रवेश आॅनलाईन की आॅफलाईन याबाबत महाविद्यालयाना विचारणा केली असता वरिष्ठ शिक्षण विभागाकडून पुढील निर्णय येण्याची वाट पाहत असल्याचे सांगितले.
नेहमीप्रमाणे ११ वीसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. तालुक्यातील नामांकित महाविद्यालयात मागील वर्षी एकूण विद्यार्थ्यांच्या एक हजार ६०० च्या विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला पसंती दिली होती. यंदाही तुकड्या वाढून विद्यार्थी संख्येत वाढ होऊन प्रवेश विज्ञान शाखेत होण्याची शक्यता आहे. १० वीचा यावर्षी शहादा तालुक्यातील ९२.४० टक्के निकाल लागला असून, त्यातील ५० टक्के विद्यार्थ्यांनी जरी विज्ञान शाखा निवडली तरी प्रवेश होणार आहेत. परंतु विज्ञान शाखेकडे कल असल्याने कला शाखेतील अनेक जागा रिक्त राहतात. त्यामुळे कला शाखांना प्रवेशासाठी कसरत करावी लागते. यंदाही तीच स्थिती असण्याची शक्यता आहे.