घरकुल योजनेचा प्रश्न बैठक घेवून मार्गी लावणार - ॲड.के.सी. पाडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:21 IST2021-07-21T04:21:13+5:302021-07-21T04:21:13+5:30

आदिवासी विकास प्रकल्पमार्फत तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांना खावटी अनुदानातील दोन हजार रूपयांचे धान्य कीट सोमवारी सायंकाळी ...

The issue of Gharkul scheme will be resolved by holding a meeting - Adv. Padvi | घरकुल योजनेचा प्रश्न बैठक घेवून मार्गी लावणार - ॲड.के.सी. पाडवी

घरकुल योजनेचा प्रश्न बैठक घेवून मार्गी लावणार - ॲड.के.सी. पाडवी

आदिवासी विकास प्रकल्पमार्फत तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांना खावटी अनुदानातील दोन हजार रूपयांचे धान्य कीट सोमवारी सायंकाळी तळोदा येथे त्यांचा हस्ते वाटप करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. या वेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, समाज कल्याण सभापती निर्मला राऊत, माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी, उपसभापती लताबाई वळवी, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, तळोदा कॉलेज ट्रस्टचे अध्यक्ष भरत माळी, प्रकल्प अधिकारी मैनेक घोष, आदिवासी विकास महामंडळ व्यवस्थापक प्रतिभा पवार, तहसीलदार गिरीश वाखारे, जिल्हा परिषद सदस्य संगीता पावरा, सुहास नाईक, हरसिंग पावरा, सी.के. पाडवी, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र सूर्यवंशी, प्रवीण वळवी, नगरसेवक संजय माळी, गौरव वाणी, सुभाष चौधरी, कल्पना पाडवी, बाजार समितीचे संचालक बापू कलाल, सुरेश इंद्रजित, रोहिदास पाडवी, प्रकाश ठाकरे, चंदन पवार, पंकज राणे उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत समाजातील गरजू, गरीब घटकांसाठी शबरी घरकूल योजना राबविली जात असते. परंतु या योजनेचा लाभ तळोदा शहरातील आदिवासी कुटुंबांना मिळत नाही. कारण त्यांचा नावावर जागा नाही. हे गाव बारगळ जहागीरदार यांना जहागिरीत मिळाले आहे. त्यामुळे जागाही त्यांचा नावावरच आहेत. ही अडचण लक्षात घेवून जागेचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच आदिवासी विकास विभागाचे सचिव व जहागीरदार शिवाजीराव बारगळ, ॲड.पदमाकर वळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांची संयुक्त बैठक घेवून त्यांचा घराच्या जागेसाठी आदिवासी विकास विभागकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे या वंचित कुटुंबांना हक्काचे पक्के घर बांधून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शबरी घरकूल योजनेसाठी शासनाने ३१० कोटी रूपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या निधीतून तळोद्यातील आदिवासी कुटुंबांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आदिवासी विकास मंत्र्यांचा घराच्या सुतोवाचाने येथील आदिवासींचा अशा पल्लवित झाल्या आहेत.

खावटी अनुदान योजनेत आतापावेतो राज्यात १० लाख लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे. अजूनही दोन लाख लाभार्थी बाकी आहेत. त्यांच्या कागद पत्रांमध्ये त्रुटी आहेत. त्याची पूर्तता केल्यावर त्यांनाही देण्यात येईल. त्याच बरोबर कुकुट पालनासाठी २०० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे गरीब कुटुंबांनी त्याचा लाभ घेवून स्वयं रोजगार निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी खावटी अनुदान योजनेसाठी मंत्री के.सी. पाडवी यांना मंत्री मंडळातील सहकारी मंत्र्यांसोबत संघर्ष करावा लागला होता तेव्हा योजना मंजूर झाल्याचे सांगितले. या वेळी ॲड.पद्माकर वळवी यांनी ही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी घोष यांनी केले. सूत्रसंचालन के.टी. पाटील यांनी केले होते. कार्यक्रमासाठी सहायक प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर, सुवर्णा शिंदे, अमित वसावे, सहायक प्रकल्प अधिकारी चौधरी यांच्यासह प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

११६० लाभार्थ्यांना वाटप केले धान्याचे कीट

तळोदा आदिवासी विकास प्रकल्पातील तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील साधारण एक हजार १६० लाभार्थ्यांना धान्याचे कीट वाटप करण्यात आले. त्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात पालक मंत्र्यांचा हस्ते चार महिला लाभार्थ्यांना कीट देण्यात आले. उर्वरित लाभार्थीना रात्री उशिरा पावेतो वाटप करण्यात आले होते. वास्तविक हे लाभार्थी दुपारी दोन वाजेपासूनच ग्रामीण भागातून पायपीट करत धान्य कीट घेण्यासाठी आले होते. मात्र कार्यक्रम पार पाडल्यानंतर त्यांना रात्री आठ वाजेला देण्यात आले. तब्बल पाच-सहा तास त्यांना तळमळत बसावे लागल्याने काहींनी तीव्र नाराजी बोलून दाखवली होती. या वेळी आदिवासी महिलांची संख्या लक्षणीय होती.

Web Title: The issue of Gharkul scheme will be resolved by holding a meeting - Adv. Padvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.