प्रकाशा ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:30 IST2021-02-13T04:30:48+5:302021-02-13T04:30:48+5:30
शहादा येथे पंचायत समितीत झालेल्या कार्यक्रमात गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांच्या हस्ते प्रकाशाचे सरपंच सुदाम ठाकरे व ग्रामविकास अधिकारी ...

प्रकाशा ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन
शहादा येथे पंचायत समितीत झालेल्या कार्यक्रमात गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांच्या हस्ते प्रकाशाचे सरपंच सुदाम ठाकरे व ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील यांना आयएसओ मानांकाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी सहायक गटविकास अधिकारी सी.टी. गोसावी, विस्तार अधिकारी सुरेश देवरे, आदींसह ग्रामसेवक उपस्थित होते. दिल्ली येथील एका कंपनीकडून झालेल्या सर्व्हेनुसार आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे. जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, सरपंच सुदाम ठाकरे, उपसरपंच भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशा ग्रामपंचायतीने शुद्ध पाणीपुरवठा, स्वच्छता अभियान, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुमारे ५०० घरे देण्यात आली आहेत. येथे ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविले जात असून त्याअंतर्गत वृक्षारोपण, बायोगॅस लाभार्थींची निवड सुरू आहे. ठक्कर बाबा योजना, जनसुविधा योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना, १५ व्या वित्त आयोगअंतर्गत कामे, पेसाअबंद निधी अंतर्गत कामे केलेली आहेत. आमदार, खासदार निधीतून गावात उल्लेखनीय कामे झालेली आहेत. गावात १२ अंगणवाड्या असून त्यांच्या इमारतीचे बांधकाम झालेले आहे. अंगणवाडी, ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळांना रंगरंगोटीही करण्यात आली आहे. या कामांमुळे ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन मिळाले असून त्यासाठी ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांचेही सहकार्य लाभले आहे.
प्रकाशा गावात सिंहस्थ पर्वणीच्या काळापासून आतापर्यंत विविध योजना आणून गावातील रस्ते, गटारी आदींच्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत. तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत धार्मिक मंदिर परिसर सुसज्ज केला जात आहे. मिळालेला हा बहुमान आनंददायी आहे.
-रामचंद्र पाटील, माजी उपाध्यक्ष, जि.प. नंदुरबार