देशप्रेमाच्या भावना भावी पिढीत रूजवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:37 IST2021-09-09T04:37:29+5:302021-09-09T04:37:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहीद शिरीषकुमार आणि त्यांच्या बालसाथीदारांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा क्रांतिकारी इतिहास प्रेरणादायी असून, हीच प्रेरणा ...

देशप्रेमाच्या भावना भावी पिढीत रूजवा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहीद शिरीषकुमार आणि त्यांच्या बालसाथीदारांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा क्रांतिकारी इतिहास प्रेरणादायी असून, हीच प्रेरणा भावी पिढीसमोर मांडून त्यांच्यात देशप्रेमाची भावना रूजवा, असे आवाहन पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने यांनी येथे केले.
शहीद शिरीषकुमार व त्यांचे चार बालसाथीदार ९ सप्टेंबर १९४२ ला हुतात्मा झाले होते. त्यामुळे नंदुरबारात दरवर्षी ९ सप्टेंबर हा शहीद दिन म्हणून पाळला जातो. शहीद दिनाच्या पूर्वसंध्येला शहीद स्मृतीतर्फे दरवर्षी व्याख्यानाचे आयोजन केले जाते. यंदा पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी ॲड. रमणभाई शाह होते, तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून खासदार डाॅ. हिना गावीत, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, ज्येष्ठ नेत्र चिकित्सक डाॅ. रागिणी पारेख, कीर्तिकुमार सोलंकी हे उपस्थित होते. यावेळी डाॅ.लहाने यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मृती जागविल्या. शहीद शिरीषकुमारांमुळे नंदुरबारचे नाव देशात घेतले जाते. त्यांच्या हौतात्म्याची सुवर्णगाथा भावी पिढीपुढे मांडून या पिढीत देशप्रेमाची भावना जागृत केली पाहिजे. कारण जात, पात, धर्म, पंथ याही पुढे जाऊन देशप्रेम हे प्रथम आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाने हीच भावना ठेवल्यास देशपुढे जाईल, असे सांगितले. खासदार डाॅ. हिना गावीत यांनी विकासाच्या बाबतीत जिल्हा जरी मागास म्हणून ओळखला जात असला तरी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात हा जिल्हा आघाडीवर राहिला आहे. सातपुड्याच्या दऱ्या-खोऱ्यातदेखील स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळी झाल्या. त्यातही अनेकांनी बलिदान दिले आहे. मात्र, तो इतिहास अद्याप जगासमोर आलेला नाही. याची खंत व्यक्त करीत रावला पाणी येथे स्मारक बनविण्यासाठी आपला केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. आपण खासदार म्हणून दिल्लीत गेल्यानंतर आपली ओळख शहीद शिरीषकुमारांचे नंदुरबार येथील खासदार म्हणून जेव्हा होतो त्याचा अभिमान वाटत असल्याचे त्यांंनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. पीतांबर सरोदे यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकात शिरीषकुमारांच्या हौतात्म्याची गाथा मांडून शहीद स्मृतीच्या कार्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी लिहिलेल्या ‘मातृधर्मी साने गुरुजी’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन शहीद स्मृतीचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र शिंदे यांनी केले.