मलगाव-सटीपाणी रस्त्याची माजी आमदारांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:35 IST2021-08-25T04:35:45+5:302021-08-25T04:35:45+5:30
या रस्त्याच्या कामाबाबत जि. प. सदस्य सुभाष पटले यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन आपण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता ...

मलगाव-सटीपाणी रस्त्याची माजी आमदारांकडून पाहणी
या रस्त्याच्या कामाबाबत जि. प. सदस्य सुभाष पटले यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन आपण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता सांगळे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली,असे पाडवी यांनी सांगितले. त्यानंतर उपअभियंता नामदेव नाईक, शाखा अभियंता राहुल चौधरी, ठेकेदार सुनील बोरसे, तक्रारदार जि.प. सदस्य सुभाष पटले व अन्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या संपूर्ण रस्त्याची पाहणी केली. या रस्त्याचा कार्यारंभ आदेश दिल्यानंतर चार वर्षे झाले तरी अद्यापही हा रस्ता अपूर्णावस्थेत आहे. मंगळवारी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी ठेकेदाराने निकृष्ट काम केल्याचे आढळून आले. एका ठिकाणी शेतकऱ्याच्या हरकतीमुळे पाईप मोरी केली नसल्याचे ठेकेदाराचे म्हणणे होते. यावर संबंधित शेतकऱ्याला बोलावून त्याचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी शेतकऱ्याने माझी कुठलीही हरकत नसून केवळ शेतातील पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा व्हावा, अशाप्रकारे मोरी करण्याची आपण मागणी केली आहे, असे सांगितले. या रस्त्यावरील मोऱ्या, अपूर्ण फरशी पूल, तुटलेले पाईपांची दुरुस्ती, लहान पुलांवर संरक्षक कठडे, मजबुतीकरण व डांबरीकरणाचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याची सूचना केली असून, येत्या १५ दिवसांत काम पूर्ण करावे अन्यथा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी आपण संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे, असे सांगितले.
उपोषणकर्ते नगरसेवकांना घरचा आहेर
शहादा पालिकेतील भ्रष्टाचारासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता उदेसिंग पाडवी म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक उपोषणाला बसला असला तरी त्यांनी याबाबत पक्षाला कुठलीही माहिती दिलेली नाही अथवा पक्षाची परवानगी घेतली नाही. यामुळे आपण उपोषणकर्त्यांची भेट घेणार नाही, कुठलीही चर्चा करणार नाही. उपोषणकर्ते नगरसेवक स्वत: पालिकेचे सदस्य आहेत, त्यांनी या कामांचा ठराव मंजूर करताना, ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देताना अथवा कामाचे बिल काढताना तक्रार का केली नाही, याचाही सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. मात्र कुठेतरी काहीतरी तथ्य असेल म्हणूनच त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला, असेही ते म्हणाले.