पाणीटंचाईबाबत बीडीओंची पुतीपाडा येथे पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST2021-03-27T04:31:20+5:302021-03-27T04:31:20+5:30
धडगाव तालुक्यातील पाडलीचा पुतीपाडा येथे जानेवारी महिन्यापासून दोन हातपंपांची पाण्याची पातळी खाली गेल्याने महिलांना दऱ्याखोऱ्यातून चढ-उताराच्या दोन ते अडीच ...

पाणीटंचाईबाबत बीडीओंची पुतीपाडा येथे पाहणी
धडगाव तालुक्यातील पाडलीचा पुतीपाडा येथे जानेवारी महिन्यापासून दोन हातपंपांची पाण्याची पातळी खाली गेल्याने महिलांना दऱ्याखोऱ्यातून चढ-उताराच्या दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या आबडीविहीर येथून पायवाटेने कसरत करीत पाणी आणावे लागत आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने छायाचित्रासह प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन धडगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी. डी. गोसावी यांनी भेट देऊन पाहणी केली. पुतीपाडा येथील अंगणवाडी केंद्राच्या आवारात २४० फुटांपर्यंत हातपंप करण्यात आला. मात्र, पाण्याची पातळी खाली गेल्याने हातपंप जेमतेम जानेवारी महिन्यापर्यंत चालले. दरवर्षी जानेवारी ते ऑगस्ट महिन्यापर्यंत पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पाण्यासाठी डोंगराखालील भागातून पाइपलाइन करून किंवा हातपंपामध्ये मोटार टाकून पाण्याची सोय उपलब्ध करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. या वेळी पंचायत समिती सदस्य विलास पाडवी, सरपंच जेवाती पाडवी, उपसरपंच कालूसिंग पाडवी, ग्रामसेवक निर्मला पराडके, ग्रामपंचायत सदस्य सतीश वळवी, ग्रामपंचायत सदस्य रामसिंग वळवी, राजू वळवी, अंगणवाडीसेविका सेकरी पाडवी, बोडा पाडवी, तानाजी गावीत, आपसिंग वळवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.