कुसुमवाडे शिवारात सापळ्यात फसलेल्या जखमी मादी बिबट्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:34 IST2021-03-09T04:34:40+5:302021-03-09T04:34:40+5:30
मादी बिबट्याचा एक पाय कसल्यातरी सापळ्यात अडकल्याचे लांबून निदर्शनास येत होते. मात्र बिबट्या डरकाळ्या देत असल्यामुळे त्याच्या सुटकेसाठी वनविभागाला ...

कुसुमवाडे शिवारात सापळ्यात फसलेल्या जखमी मादी बिबट्याचा मृत्यू
मादी बिबट्याचा एक पाय कसल्यातरी सापळ्यात अडकल्याचे लांबून निदर्शनास येत होते. मात्र बिबट्या डरकाळ्या देत असल्यामुळे त्याच्या सुटकेसाठी वनविभागाला कुठलेच प्रयत्न करता आले नाहीत. अखेर सायंकाळी पाच-साडेपाच वाजेच्या दरम्यान कुठलीही वैद्यकीय सुविधा न घेता पथकाने त्याच्या अंगावर जाळी टाकून त्यास जेरबंद केल्यानंतर सापळ्यातून त्याचा पाय काढून त्याची सुटका केली. यासाठी वनविभागाच्या पथकाला सुमारे सहा ते साडेसहा तासांचा कालावधी लागला.
मादी बिबट्याची सुटका केल्यानंतर त्याची परिस्थिती मरणासन्न होती. तिला राणीपूर येथे वनविभागाच्या कार्यालयात आणत असताना रस्त्यात ती मयत झाली. राणीपूर वनविभागाच्या कार्यालयात पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागर परदेशी यांनी शवविच्छेदन करून विसेरा व महत्त्वाचे अवयव अधिक तपासणीसाठी मुंबई येथे पाठविल्यानंतर सायंकाळी उशिरा राणीपूर येथील वनविभागाच्या कार्यालयात मयत मादी बिबट्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, या संपूर्ण परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ सुरू असल्याने व शेतातील पिके ते नष्ट करत असल्याने त्यांना पकडण्यासाठी स्थानिक शेतकरी काही लोकांच्या मदतीने शेतात सापळा लावतात. अशाच एका सापळ्यात सदर मादी बिबट्याचा पाय अडकला असावा. त्यामुळे तिची सुटका झाली नाही. सदर घटना सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आली. मात्र त्याच्या सुटकेसाठी वनविभागाच्या पथकाने आवश्यक ती दखल वैद्यकीय सुविधेसह न घेतल्याने अति रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे. तर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी बेशुद्ध करण्यासाठी प्रशिक्षित डॉट गण कर्मचाऱ्याला वनविभागाने पाचारण केलेले नाही.
बिबट्याची सुटका करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू असताना तेथे जमा झालेल्या अनेक गावकऱ्यांनी वनविभागाच्या पथकावर दगडफेक केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मयत बिबट्याच्या मृत्यूस वनविभागाचे कर्मचारी जबाबदार असल्याच्या आरोप स्थानिक गावकऱ्यांनी केला आहे. मादी बिबट्याची सुटका केल्यानंतर तिला शहादा येथील मुख्य कार्यालयात आणण्याऐवजी वनविभागाच्या पथकाने राणीपूर वनविभागाच्या कार्यालयात का नेले असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झालेले आहेत.
कोट
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. सुमारे साडेसहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याची सापळ्यातून सुटका करण्यात पथकाला यश आले. मात्र यादरम्यान बिबट्याची प्रकृती खालावल्याने व तो उपाशी असावा यामुळे मादी बिबट्या दगावली या घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्वांची चौकशी करण्यात येऊन कारवाई केली जाईल.
- एस.के. खुणे, वनक्षेत्रपाल शहादा व राणीपूर विभाग