बेफिकीरपणा पुन्हा कोरोनाला आमंत्रण देणार, सण, उत्सवांमधील गर्दी कारणीभूत, चाचण्या वाढविणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:32 IST2021-08-23T04:32:47+5:302021-08-23T04:32:47+5:30

सण, उत्सवांमधील गर्दी सध्या सण, उत्सवांची रेलचेल सुरू आहे. शासन, प्रशासनाने कोरोनाचे अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे कोरोना ...

Indifference will again invite Corona, causing crowds at festivals, the need to increase tests | बेफिकीरपणा पुन्हा कोरोनाला आमंत्रण देणार, सण, उत्सवांमधील गर्दी कारणीभूत, चाचण्या वाढविणे गरजेचे

बेफिकीरपणा पुन्हा कोरोनाला आमंत्रण देणार, सण, उत्सवांमधील गर्दी कारणीभूत, चाचण्या वाढविणे गरजेचे

सण, उत्सवांमधील गर्दी

सध्या सण, उत्सवांची रेलचेल सुरू आहे. शासन, प्रशासनाने कोरोनाचे अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे कोरोना कायमचा हद्दपार झाला, या आविर्भावात नागरिक वावरत आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना, बाजारात फिरताना, कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना कुणाच्याही चेहऱ्यावर मास्क नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता वाढली आहे. त्याचे परिणाम जिल्हावासीयांना येत्या काळात भोगावे लागतील, हे स्पष्टच आहे.

विनामास्कची कारवाईही थंडावली

जिल्ह्यात पूर्वी विनामास्कची कारवाई पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर करण्यात येत होती. दीड वर्षात तब्बल ७० हजार जणांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. परंतु कोरोनाचे निर्बंध शिथिल होताच विनामास्कची कारवाईदेखील थंडावली आहे. पूर्वीप्रमाणेच पोलिसांनी विनामास्कची कारवाई सुरू ठेवली, तर किमान नागरिकांमध्ये मास्क लावण्याचे तरी भान राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोविड कक्षही बंद

जिल्ह्यातील ठिकठिकाणी सुरू करण्यात आलेले कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयात असलेल्या कोविड कक्षात बेड तयार ठेवण्यात आलेले असले, तरी या सेंटरमधील डॅाक्टर व इतर कर्मचारी काढून घेण्यात आले आहेत. ज्यांना तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यात आले होते, त्यांची सेवासमाप्ती करण्यात आली आहे.

खाजगी रुग्णालयांमधील कोविड कक्षही बंदच आहेत. असे असले तरी संशयित रुग्ण आल्यास त्यावर कोरोनाच्या नियमांच्या आधारे उपचार केले जात आहे.

दक्षता न घेतल्यास पुन्हा संकट

नागरिकांनी दक्षता न घेतल्यास कोरोनाचे संकट पुन्हा दाराशी येणार आहे. तिसऱ्या लाटेबाबत आरोग्य यंत्रणा इशारे देत आहेत. असे असतानाही नागरिकांमधील बेफिकीरपणा वाढतच चालला आहे. येत्या काळात अर्थात दिवाळीपर्यंत अनेक सार्वजनिक सण, उत्सव साजरे होणार आहेत. त्यातील गर्दी संकटाला आमंत्रण देणारी ठरणार आहे. दिवाळीनंतर लागलीच लग्नसीझनदेखील सुरू होणार आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी ते पोषक तर ठरणार नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सर्दी, खोकला, तापाची साथ

जिल्ह्यात वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. संसर्गजन्य असलेल्या या आजारामुळे अनेक दवाखान्यांमध्ये अशा रुग्णांची गर्दी होत आहे. जिल्हा रुग्णालयातील ओपीडीचा अंदाज घेतला तर साथीच्या अशा आजाराचे रुग्ण सर्वाधिक असल्याचे चित्र आहे. साधारण सर्दी, ताप असल्यास घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोना चाचण्या वाढवाव्या

सध्याचे साथीचे आजार आणि आढळून आलेला नवीन रुग्ण हे पाहता जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढवाव्या, अशी मागणी होत आहे. कारण आठवी ते १२ वीचे वर्ग सुरू आहेत. आश्रमशाळादेखील सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे. यापूर्वी झालेल्या बैठकांमध्ये जिल्हाधिकारी यांनी तशा सूचनाही दिलेल्या आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांचा अंदाज घेतला तर सरासरी १०० ते १५० जणांच्या चाचण्या केल्या जात आहेत. चार दिवसांत ६३० जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Web Title: Indifference will again invite Corona, causing crowds at festivals, the need to increase tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.