कोरोनामुळे अनाथ झालेल्या ७०० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटना घेणार; बीजेएसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:21 IST2021-06-26T04:21:48+5:302021-06-26T04:21:48+5:30
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. हे विद्यार्थी प्रचंड तणावाखाली जीवन जगत आहेत. त्यांना दैनंदिन शिक्षणासोबच मानसिक तणावामधून ...

कोरोनामुळे अनाथ झालेल्या ७०० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटना घेणार; बीजेएसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. हे विद्यार्थी प्रचंड तणावाखाली जीवन जगत आहेत. त्यांना दैनंदिन शिक्षणासोबच मानसिक तणावामधून बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे व ते साकारण्यासाठी सक्षम करणे हे मोठे आव्हान आहे. भारतीय जैन संघटनेच्या पुणे येथील शैक्षणिक संकुलात वसतिगृह, खेळाचे मैदान, दवाखाना, मानसोपचार तज्ज्ञ, भोजन, नास्ता अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. येथे यापूर्वी लातूर येथील १२०० भूकंपग्रस्त विद्यार्थी, मेळघाट व ठाण्यातील ११०० आदिवासी विद्यार्थी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे ७०० विद्यार्थी अशा एकूण तीन हजार विद्यार्थ्यांना मानसिक तणावामधून बाहेर काढून त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन गेल्या ३० वर्षात भारतीय जैन संघटनेने केले आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची माहिती मिळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांना कोरोनामुळे अनाथ झालेल्या ७०० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटना घेणार असल्याबाबतचे निवेदन बीजेएसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती व फॉर्म भरण्यासाठी डॉ.कांतिलाल टाटिया, भवरलाल जैन, मनोज कोचर, भरत ओस्तवाल, ललित छाजेड, आशिष छाजेड (शहादा), नरेश कांकरिया व अमोल सिसोदिया (नंदुरबार), शुभम जैन (अक्कलकुवा), ॲड.अल्पेश सेठीया (तळोदा), हार्दिक जैन (खेतिया-खेडदिगर), हर्षल ओसवाल (नवापूर) व जैन संघटनेचे कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.