नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वतंत्र जिल्हा बँक फायद्याचीच- चंद्रकांत रघुवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:35 IST2021-03-01T04:35:30+5:302021-03-01T04:35:30+5:30

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यासाठी वेगळी जिल्हा मध्यवर्ती बॅंक ही फायद्याचीच ठरणार आहे. जिल्ह्यात बँकेचे एकही मोठे कर्जदार नाही. त्यामुळे ...

Independent District Bank is beneficial for the farmers of Nandurbar district - Chandrakant Raghuvanshi | नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वतंत्र जिल्हा बँक फायद्याचीच- चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वतंत्र जिल्हा बँक फायद्याचीच- चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यासाठी वेगळी जिल्हा मध्यवर्ती बॅंक ही फायद्याचीच ठरणार आहे. जिल्ह्यात बँकेचे एकही मोठे कर्जदार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वतंत्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निर्माण व्हावी यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याची माहिती माजी आमदार तथा बँकेचे संचालक चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.

रविवारी नंदुरबार येथे पत्रकारांशी ते बोलत होते. रघुवंशी म्हणाले, जिल्हा निर्मितीला २२ वर्ष झाली आहे. आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लहान भावाचीच भूमिका स्वीकारली. प्रत्येक ठरावाला संमती दिली. झालेल्या विविध आरोपांबाबत कधीही साधी चौकशीची मागणी केली नाही. परंतु आता जिल्ह्याच्या स्वाभिमानाच्या दृष्टीने वेगळी जिल्हा बँक व्हावी या मानसिकतेत आपण व जिल्ह्यातील इतर नेतेमंडळी व शेतकरी आले आहेत.

जिल्ह्यातील एकही मोठा कर्जदार नाही. केवळ आदिवासी सहकारी साखर कारखान्याला बँकेने कर्ज दिलेले आहे. बँकेचे सर्वात मोठे कर्जदार हे धुळे जिल्ह्यातीलच आहेत. जिल्ह्यात बँकेच्या स्वत:च्या इमारतीत शाखा नाहीत. ८० टक्के शाखा या भाड्याच्या इमारतीत आहेत. नंदुरबारात बँकेसाठी इमारतीचा प्रश्न जर उभा राहिला तर अवसायानात गेलेल्या पी.के. अण्णा पाटील जनता सहकारी बँकेची सुसज्ज इमारत तयार आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने जिल्ह्यासाठी स्वतंत्र बँक होणे गरजेचे आहे हे यावरून स्पष्ट होते.

माझी चेअरमन होण्याची अभिलाषा असल्यामुळे मी ही मागणी करीत असल्याचा आरोप केला जातो. परंतु त्याला अर्थ नाही. लोकशाही मार्गाने कुणीही बँकेचे चेअरमन होऊ शकतो, ही पुढची बाब आहे.

ठाणे जिल्ह्यातून वेगळी पालघर जिल्हा बँक सुरू करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे पालघर सोबत नंदुरबारचीही स्वतंत्र जिल्हा बँक व्हावी यासाठी आपण आग्रही आहोत. स्वतंत्र जिल्हा बँक कशी जिल्ह्याच्या दृष्टीने फायद्याची आहे ही बाब आपण राज्याचे सहकारमंत्री, अर्थमंत्री यांना पटवून देणार आहोत. त्यासाठी आपला पाठपुरावा कायम राहणार असल्याचेही चंद्रकांत रघुवंशी यांनी स्पष्ट केले.

Web Title: Independent District Bank is beneficial for the farmers of Nandurbar district - Chandrakant Raghuvanshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.