लॉकडाऊनमध्ये भाजीपाला लागवडीचा वाढला टक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 21:18 IST2020-08-05T21:17:58+5:302020-08-05T21:18:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे चार महिन्यात बाजारपेठेची वाताहत झाली आहे़ अनेक व्यवसाय रसातळाला गेल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत़ ...

लॉकडाऊनमध्ये भाजीपाला लागवडीचा वाढला टक्का
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनमुळे चार महिन्यात बाजारपेठेची वाताहत झाली आहे़ अनेक व्यवसाय रसातळाला गेल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत़ मात्र शेतशिवारात याउलट स्थिती असून कोरोनामुळे भाजीपाला मागणी वाढल्याने जिल्ह्यात भाजीपाला लागवडही वाढली आहे़ गेल्या वर्षात ९ हजार हेक्टरपर्यंत होणारा भाजीपाला यंदा थेट ११ हजार हेक्टरवर गेल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला आधार देणार अशी शक्यता आहे़
हंगामी भाजीपाला लागवडीवर भर दिल्या जाणाºया नंदुरबार जिल्ह्यात प्रामुख्याने भेंडी, वांगी, कोबी, फ्लावर, कांदा आणि मिरची या भाजीपाला पिकांची लागवड करण्यात येते़ तीन ते सहा महिन्याच्या उत्पादनाला लागणारे पाणी आणि खर्च यामुळे मर्यादित शेतकरी भाजीपाला लागवड करतात़ यंदा कोरोनामुळे मार्च ते जून या काळात सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे भाजीपाल्याला मोठी मागणी मिळत होती़ यातून बºयाच शेतकऱ्यांनी या काळात भाजीपाला लागवड करुन घेत संधी सोने करण्याचा प्रयत्न केला आहे़ यातही भाजीपाला खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढत असल्याचे दावे सुरू झाल्याने बाजारातून सर्वच भाजीपाल्याला उठाव मिळाल्याने शेतकºयांचा उत्साह दुणावून लागवडीचे क्षेत्र वाढले आहे़
जिल्ह्यात आजअखेरीस ११ हजार ६६३ हेक्टरवर भाजीपाला लागवड करण्यात आली आहे़ यात २८९ हेक्टर टोमॅटोे, २८० हेक्टर वांगी, ३१६ हेक्टर भेंडी, २२० हेक्टर कोबी तर सात हजार ७१ हेक्टर क्षेत्रात विविध पालेभाज्या तसेच फळवर्गीय भाज्यांचा समावेश आहे़ यापूर्वी जिल्ह्यात उन्हाळी व पावसाळी भाजीपाला लागवड ही किमान ९ हजार हेक्टरच्या पुढे जात नव्हती़ तालुकानिहाय भाजीपाला पिकांचा आढावा घेतल्यास शहादा तालुक्यात ७ हजार ८०५ हेक्टरवर विविध फळ आणि पालेभाज्यांची लागवड करण्यात आली आहे़ त्याखालोखाल नंदुरबार ३ हजार ४२१, नवापूर १३८, तळोदा ११८, धडगाव ३४ तर अक्कलकुवा तालुक्यात १४७ हेक्टरवर भाजीपाला लागवड झाली आहे़ एकीकडे भाजीपाला लागवड वाढत असताना कांदा लागवडीचे क्षेत्र मात्र मर्यादित असल्याचे चित्र आहे़ आतापर्यंत १२२ हेक्टर क्षेत्रात कांदा लागवड झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे़ लागवड झालेला बहुतांश भाजीपाल्याचे उत्पादन ३० ते ४५ दिवसात येण्यास सुरूवात होणार आहे़