नंदुरबारातील तापमानात पुन्हा वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 12:56 IST2019-05-20T12:56:37+5:302019-05-20T12:56:55+5:30
तापमान ४२ अंशावर : २५ मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार

नंदुरबारातील तापमानात पुन्हा वाढ
नंदुरबार : गेल्या तीन दिवसांपासून नंदुरबारात उष्णतेच्या लाटेचे पुनर्रागमण झालेले दिसून येत आहे़ रविवारी नंदुरबारात ४२ अंश सेल्शिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली़
मध्य व उत्तर महाराष्ट्रात १९ ते २५ मेपर्यंत उष्णतेची लाट येण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आह़े त्यानुसार अंदाजाच्या पहिल्याच दिवशी नंदुरबारातील तापमान ४२ अंशावर गेले दिसून आले़ दरम्यान, नंदुरबारात दिवसभर उष्ण लहरींचा प्रभाव जाणवत होता़ त्यामुळे साहजिकच सायंकाळी व रात्रीदेखील मोठ्या प्रमाणात उष्णतेच्या झळा जाणवत होत्या़
नंदुरबारात रविवारी दुपारी काळी काळ उन्ह-सावलीचा खेळ सुरु होता़ तसेच वाऱ्यांचा प्रभावही अधिक जाणवत होता़ ताशी १२ किमी वेगाने वारे वाहत होते़ परंतु यामुळे उन्हतेत मात्र कुठलीही कमी झाली नाही़ या उलट घरातदेखील बाहेरील उष्ण लहरी येत असल्याने नागरिकांना प्रचंड उष्णतेचा त्रास सहन करावा लागत होता़ वाढत्या उष्णतेमुळे अनेक नागरिकांनी घरावर हिरवा कापडाचे आच्छादन केलेले आहेत़ दुपारच्या उकाड्यांपासून बचाव करण्यासाठी पंखे, कुलर, एसी आदींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे़ वाढत्या उष्णतेमुळे सर्वच दुपारच्या वेळी ऐरवी गजबजणारे रस्तेदेखील ओस पडत असल्याची स्थिती आहे़ त्यातच भर उन्हात भाजीपाला तसेच इतर वस्तूंची विक्री करताना फेरीवाल्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे बोलले जात आहे़ पुढील तीन ते चार दिवस प्रचंड उष्णतेची राहणार असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे़ संतुलित आहार घेत भरपूर पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे़