आठ दिवसात वाढले तब्बल 500 रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 12:18 IST2021-01-11T12:18:09+5:302021-01-11T12:18:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाढते सार्वजनीक कार्यक्रम आणि त्यामधील नियमांचे पालन होत नसल्याने सद्या कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच ...

आठ दिवसात वाढले तब्बल 500 रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वाढते सार्वजनीक कार्यक्रम आणि त्यामधील नियमांचे पालन होत नसल्याने सद्या कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. गेल्या आठ दिवसात अर्थात नव्या वर्षात तब्बल ५०० रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा मानली जात आहे. जिल्हाधिकारी यांनी याबाबत संबधीत यंत्रणेला नियमांची कडक अंमबलजावणी करण्याचे निर्देश द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नव्या वर्षात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यातील बाधितांचा आकडा हा आठ हजाराचा पार गेला आहे. शहरी भागासह ग्रामिण भागात देखील कोरोनाचा कहर सुरू आहे.
निर्बंध शिथीलमुळे धोका
लग्न समारंभ, सार्वजनिक समारंभ आणि बाजारातील नियमांचे उल्लंघन यामुळे कोरोना वाढत असल्याचे चित्र आहे. लग्न समारंभांमध्ये पूर्वी उपस्थितीची मर्यादा राहत होती. त्यामुळे प्रत्येकजण सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून उपस्थित राहत होता. परंतु आता उपस्थितीवर कुठलीही मर्यादा नसल्यामुळे हजारोजण सहभागी होत आहेत. अशा वेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही.
मास्कचा वापर नाही किंवा सॅनिटायझरचा देखील वापर केला जात नसल्याचे ठिकठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. अशीच स्थिती विविध संस्था, संघटना यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमांमध्ये देखील तीच स्थिती राहत आहे. बाजारात देखील दाटीवाटीने विक्रेत बसत असून त्यांच्याकडे खरेदीदारांची होणारी गर्दी देखील त्याला आंमत्रण देत आहे.
ग्रामिण भागातही वाढता प्रादुर्भाव
ग्रामिण भागात देखील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे. शहादा व तळोदा तालुक्याच्या सिमेवरील शहादा तालुक्यातील कलमाडी येथे तब्बल ८० पेक्षा अधीक रुग्ण आढळून आले आहेत. आता या गावातील परिस्थीत नियंत्रणा असली तरी परिसरातील गावांमध्ये संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. ग्रामस्थांनी देखील याबाबत आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
वातावरण बदलाचा परिणाम
वातावरण बदलाचा देखील परिणाम दिसून येत आहे. सद्या विविध साथीचे आजार सुरू आहेत. त्यात सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप या आजारांनी डोके वर काढले आहे. संसर्गीत असलेले हे आजार योग्य औषधोपचाराने तीन ते चार दिवसात बरे होत असले तरी नागरिक घाबरून जात आहे. कोरोनाच्या लक्षणाची धास्ती घेऊन अनेकजण उपचार घेण्यासाठी टाळाटाळ देखील करीत आहेत तर काहीजण थेट स्वॅब देऊन मोकळे होत आहेत. सद्या खाजगी व सरकारी दवाखान्यांमध्ये असे रुग्ण उपचारासाठी दिसून येत आहेत.
असे वाढले रुग्ण...
३१ डिसेंबर रोजी जिल्ह्यात सात हजार ५१७ रुग्ण होते. तर मृतांची संख्या १६८ होती. आठ दिवसातच ही संख्या ५०० ने वाढून ती आता आठ हजार ८३ इतकी झाली आहे.
आठ दिवसात दहा रुग्ण देखील दगावले आहेत. आताच्या स्थितीत कोरोनामुळे मृत्यूची संख्या १७८ वर पोहचली आहे.
येत्या काळात संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.