वृंदावन नगरातील रस्त्यावर पाणी साचून असल्याने नागरिकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:31 IST2021-09-03T04:31:22+5:302021-09-03T04:31:22+5:30
पालिका प्रशासनाला व स्थानिक नगरसेवकाला अनेकदा तक्रारी करून सुद्धा रस्त्यांची अवस्था जैसे थे आहे. प्रत्येक पावसाळ्यात या रस्त्यांला नदीचे ...

वृंदावन नगरातील रस्त्यावर पाणी साचून असल्याने नागरिकांची गैरसोय
पालिका प्रशासनाला व स्थानिक नगरसेवकाला अनेकदा तक्रारी करून सुद्धा रस्त्यांची अवस्था जैसे थे आहे. प्रत्येक पावसाळ्यात या रस्त्यांला नदीचे स्वरूप निर्माण होते व त्यामुळे परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करून वसाहतीत ये-जा करावी लागते. या वेळी स्थानिक रहिवासी व वृंदावन नगर परिसरात येणाऱ्या नागरिकांना या दयनीय अवस्थेमुळे विनाकारण त्रास सहन करावा लागतो. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे व मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेकदा लहान-मोठे अपघातही होत असतात. शाळकरी विद्यार्थ्यांना या रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून जाताना अनेकदा लहान लहान अपघातांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आबालवृद्धांसह बालकांना इजा सहन करावी लागत असल्याने नागरिकांनी प्रत्यक्ष नगरपालिका गाठित पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना परिसरातील कैफियत ऐकवली व समस्यांसंदर्भात निवेदनही दिले.
निवेदनावर धारू दुल्लभ पाटील, भानुदास सोमजी पाटील, सुभाष जीवन पाटील, रमाकांत मुरार पटेल, छाया गोविंद पाटील, मोतीलाल मंगेश पाटील, मधुकर सोमजी पाटील, उमेश यादव चौधरी, योगेश पाठक, छोटू दुल्लभ पाटील, तृप्ती राहुल भावसार, देवीदास भिकाजी पाठक, युवराज रोहिदास पाटील, परेश राजेंद्र जैन आदींच्या सह्या आहेत. या वेळी रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. रस्त्याचे मजबुतीकरण व नूतनीकरणासह सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारींचे काम करण्यात येणार आहे. सध्या पावसाळा असल्यामुळे जून महिन्यापासून काम बंद आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येईल. या रस्त्याशेजारी खुल्या जागेत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार असल्याने भविष्यात परिसरातील नागरिकांना कुठल्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. - संदीप पाटील, नगरसेवक प्रभाग सहा.