शहादा तालुका श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण कार्यालयाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST2021-01-10T04:24:02+5:302021-01-10T04:24:02+5:30
शहादा येथील ५६ गाळा मार्केट येथे राम मंदिर निधी समर्पण कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. खगेंद्र बुवा महाराज, गोरक्षनाथ मंदिर ...

शहादा तालुका श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण कार्यालयाचा शुभारंभ
शहादा येथील ५६ गाळा मार्केट येथे राम मंदिर निधी समर्पण कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. खगेंद्र बुवा महाराज, गोरक्षनाथ मंदिर तोरणमाळचे महंत संजय नाथ महाराज व वडछील आश्रमाचे श्री नारायण चैतन्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत रामधूनच्या भजनाने कार्यालयाचा प्रारंभ झाला. उपस्थित संतांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्र, भारत माता व याहा मोगी माता यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. शहादा समितीचे प्रमुख राजेंद्र दिलीप साळी यांनी अभियानाची माहिती व शहादा तालुका कार्यकारिणी जाहीर केली. त्यानंतर खगेंद्र महाराज यांनी प्रभू रामचंद्रांचे महत्त्व व राम मंदिर उभारणीत भारतातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे, असे सांगितले. अजय कैलासचंद्र गोयल यांनी दोन लाख २१ हजार रुपयांचे समर्पण चेकद्वारे निधी समितीचे अध्यक्ष खगेंद्र महाराज यांना दिले. खगेंद्र महाराज यांनी पाच हजार १००, संजयनाथ महाराज यांनी ११ हजार, नारायण चैतन्यदास महाराज यांनी पाच हजार १००, विनोद जैन २१ हजार, डॉ. हेमंत सोनी ११ हजार, रमेशचंद्र टाटिया ११ हजार, पंकज सोनार ११ हजार, मनीष चौधरी पाच हजार १००, जयेश देसाई पाच हजार १००, विजय पाटील (लोणखेडा) पाच हजार १००, संदीप पाटील (लोणखेडा) पाच हजार १०० याप्रमाणे समर्पण निधी जाहीर करण्यात आला. या सर्व दात्यांचा सत्कार निधी समितीचे अध्यक्ष खगेंद्र महाराज यांनी केला. शहादा तालुका संघचालक डॉ. हेमंत सोनी यांनी समारोप करताना सर्व नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त वेळ देऊन घराघरात जाऊन या अभियानाची माहिती देऊन जनजागरण व निधी संकलन करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमासाठी मनीष चौधरी, राजा साळी, संजय कासोदेकर, गणेश धाकड, संकेत पाटील, शिवम सोनार, गोविंदा जोहरी, ललीत पाटील, प्रदीप चौधरी आदींनी परिश्रम घेतले.