जांगठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, दुर्गम भागातील आरोग्याच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य - ॲड. के. सी. पाडवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST2021-06-09T04:38:31+5:302021-06-09T04:38:31+5:30
अक्कलकुवा तालुक्यातील जांगठी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, खासदार ...

जांगठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, दुर्गम भागातील आरोग्याच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य - ॲड. के. सी. पाडवी
अक्कलकुवा तालुक्यातील जांगठी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, दिलीप नाईक, जिल्हा परिषद सदस्य सी. के. पाडवी, तहसीलदार रामजी राठोड, गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील मालखेडे आदी उपस्थित होते.
ॲड. पाडवी म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आरोग्य केंद्रासाठी निधी देण्यात आला आहे. परिसरातील गरज लक्षात घेता काही काळानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात परिवर्तन करावे लागेल. त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगल्या सुविधा द्याव्यात. त्यांना चांगली सेवा करण्यासाठी प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. जिल्ह्यात विविध माध्यमातून ६९ रुग्णवाहिकांची सुविधा होत आहे. दुर्गम भागातील आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासोबत कोरोनावर नियंत्रण मिळविण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. नागरिकांनी या आजाराचे दुष्परिणाम लक्षात घेऊन वेळीच लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे येणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सहकार्य करण्यात येईल. विजेची समस्या सोडविण्यासाठीही सहकार्य करण्यात येईल. जिल्ह्यातील एक लाख ५३ हजार कुटुंबांना खावटी योजनेअंतर्गत दोन हजार रुपये डीबीटीद्वारे आणि दोन हजार रुपयांचे साहित्य देण्यात येणार आहे, असेही पालकमंत्री ॲड. पाडवी म्हणाले.
जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी म्हणाल्या की, ग्रामीण भागात सुसज्ज इमारत उभी करण्यात आली आहे. आरोग्य केंद्रामुळे महिला आणि बालकांवर तातडीने उपचार करणे सोयीचे होईल. सिकलसेल, कुपोषणसारख्या समस्या दूर करण्यासाठी आरोग्य केंद्र उपयुक्त ठरेल. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या भागातील समस्या सोडविण्यात येतील, असे त्यानी सांगितले. अक्कलकुवा तालुक्याने कोरोना लसीकरणात चांगली कामगिरी केल्याचा त्यांनी उल्लेख केला. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही सीमा वळवी यांनी केले.
खासदार डॉ. हिना गावीत म्हणाल्या की, दुर्गम भागातील आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आरोग्य केंद्र इमारत उपयुक्त ठरणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागासाठी चांगल्या सुविधा होत आहेत. आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका मिळाली असल्याने पुढील काळात परिसरातील आरोग्याचा प्रश्न सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अधिकाऱ्यांनी दुर्गम भागातील समस्या सोडविण्यासाठी संवेदनशीलतेने काम करावे, असेही त्या म्हणाल्या. माजी मंत्री ॲड. वळवी यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता एस. व्ही. पवार यांनी आरोग्य केंद्राची माहिती दिली. या इमारतीवर पाच कोटी १७ रुपये लाख खर्च झाला असून, कर्मचारी निवासस्थानासह सर्व सुविधा येथे उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमास परिसरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.