बर्डी शासकीय आश्रमशाळेतील मुलींच्या वसतिगृह इमारतीचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST2021-06-09T04:38:34+5:302021-06-09T04:38:34+5:30
कार्यक्रमास जि.प. अध्यक्षा सीमा वळवी, जि.प.चे समाज कल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, माजी ...

बर्डी शासकीय आश्रमशाळेतील मुलींच्या वसतिगृह इमारतीचे उद्घाटन
कार्यक्रमास जि.प. अध्यक्षा सीमा वळवी, जि.प.चे समाज कल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी, दिलीप नाईक, जि.प. सदस्य सी.के. पाडवी, रूपसिंग तडवी, कार्यकारी अभियंता डी.बी. बागूल, प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर, तहसीलदार रामजी राठोड आदी उपस्थित होते.
पालकमंत्री ॲड.पाडवी म्हणाले की, इमारती उभ्या करण्यासोबत गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणे गरजेचे आहे. त्यासाठी अध्यापन पद्धतीत बदल करीत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावे लागतील. आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सहाय्य करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सुविधांचा लाभ घेऊन उच्च शिक्षित व्हावे आणि गावाचा विकास घडवून आणावा. वसतिगृह इमारतीमुळे विद्यार्थ्यांसाठी चांगली सुविधा निर्माण झाली आहे. बर्डी आश्रमशाळेची कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे. कोरोनाच्या संकटातही विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी एकत्रितरित्या चांगले काम केले आहे. गेल्यावर्षी राज्यातील आश्रमशाळा बांधकामासाठी ५०० कोटींपेक्षा जास्त आणि यावर्षी ६०० कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कोरोनाविषयक माहिती द्यावी आणि विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
तळोदा प्रकल्पांतर्गत १३ इमारतींचे काम सुरू आहे. आठ इमारतींच्या कामाला मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती मेतकर यांनी दिली. मुलामुलींच्या वसतिगृह इमारतींचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती बागूल यांनी दिली. पालकमंत्री ॲड.पाडवी यांच्या हस्ते वसतिगृह परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. एमबीबीएस शिक्षण पूर्ण करणाऱ्या बर्डी आश्रमशाळेचा विद्यार्थी सायसिंग वसावे याचा ॲड.पाडवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास परिसरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
बर्डी येथील इमारतीसाठी चार कोटी १२ लाख खर्च झाला असून संरक्षक भिंतीचे कामही करण्यात आले आहे. वसतिगृह इमारतीत ७५ मुलींसाठी सुविधा करण्यात आली आहे. मनोरंजनासाठी सभागृह, अधीक्षक निवास, सिकरूम, अभ्यास कक्ष, भोजनकक्ष आदी सुविधा येथे करण्यात आली आहे.