सॅनिटरी नॅपकिन योजनेची अंमलबजावणी रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 12:21 IST2019-05-19T12:20:00+5:302019-05-19T12:21:00+5:30
महिला व बालकल्याण विभाग। शासनाच्या आदेशाला जि़प़कडून केराची टोपली

सॅनिटरी नॅपकिन योजनेची अंमलबजावणी रखडली
नंदुरबार : किशोरवयीन अर्थात 13 ते 19 या वयोगटातील दारिद्रयरेषेखालील शालेय व शाळाबाह्य मुलींना आवश्यक अशा आरोग्यविषयक साहित्यांच्या मोफत वाटप करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या़ परंतु नंदुरबार जिल्हा परिषदेकडून याबाबत कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही़
माहिती अधिकार कार्यकर्ते दिलीपसिंग खुमानसिंग गिरासे यांनी याबाबत जि़प़ प्रशासनाकडून माहिती मागवली होती़ त्याला उत्तर देताना हा धक्कादायक प्रकार समोर आला आह़े दरम्यान, राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, बुलढाणा, अमरावती, लातूर, बीड, सातारा व उस्मानाबाद या नऊ जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना माफक दरात सॅनिटरी नॅपकीनचे वितरण करण्याच्या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आह़े
केंद्र शासनाच्या आदेशाला नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून केराची टोपली दाखविण्यात आली आह़े दरम्यान, किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीमध्ये स्वच्छतेविषयक जनजागृती करुन त्यांना माफक दरात मोफत गावपातळीवर सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देण्याचे आदेश होत़े यासाठीचा खर्च जिल्हा महिला व बालकल्याण समितीच्या 10 टक्के निधीमधून करण्याची तरतूद आह़े