कृत्रिम तलावातील मूर्तीचे केले तापी नदीत विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 12:39 IST2020-08-29T12:39:14+5:302020-08-29T12:39:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात पहिल्या टप्प्यात तीन ठिकाणच्या कृत्रिम तलावात करण्यात आलेल्या मूर्ती विसर्जनानंतर तलावांची स्वच्छता करण्यात ...

कृत्रिम तलावातील मूर्तीचे केले तापी नदीत विसर्जन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरात पहिल्या टप्प्यात तीन ठिकाणच्या कृत्रिम तलावात करण्यात आलेल्या मूर्ती विसर्जनानंतर तलावांची स्वच्छता करण्यात आली. मूर्ती एकत्रीत करून त्या एका वाहनाद्वारे तापी नदीत विसर्जनासाठी नेण्यात आल्या. आता अनंत चतुदर्शीच्या दिवशी या तलावांच्या ठिकाणी आणखी सोयी केल्या जाणार आहेत. दरम्यान, सोनी विहिर परिसरात असलेले उकिरडे व घाणीचे साम्राज्य हटवावे अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.
नंदुरबारात गुरुवारी पहिल्या टप्प्यातील गणेश विसर्जन पार पडले. मूर्ती विसर्जनासाठी पालिकेतर्फे चार ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. पैकी एक तलाव गैरसोयीचा असल्याने लागलीच बुजविण्यात आला होता. त्यामुळे साक्रीनाका भागातील दसेरा मैदानाजवळील तलाव, नळवा रस्त्यावरील वैशाली नगर भागात आणि निझर रस्त्यावर सी.बी.पेट्रोलपंप मागील जागेवरील तलावात मूर्ती विसर्जन करण्यात आले. त्या ठिकाणी गुरुवारी दिवसभर मूर्ती विसर्जनासाठी भाविकांची गर्दी कायम होती.
या तलावात विसर्जीत करण्यात आलेल्या मूर्ती आणि निर्माल्य काढण्याचे काम शुक्रवारी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केले. मूर्ती गोळा करून त्या एका वाहनाद्वारे तापी पात्रात विसर्जनासाठी नेण्यात आल्या. याशिवाय तलावातील आणि परिसरातील स्वच्छता देखील करण्यात आली.
काल राहिलेल्या त्रुटी अनंत चतुदर्शीला दूर करण्यात येतील. त्यासाठी नियोजन करून काम करण्याच्या सुचना देखील देण्यात आल्या आहेत.
सोनी विहिर परिसरात घाणीचे साम्राज्य
याशिवाय मानाच्या गणपतींच्या मूर्ती विसर्जन करण्यात येणाºया सोनी विहिरीतील गाळ आणि इतर घाण पालिकेने काढली. विहिरीत पाणी टाकण्यात येत आहे. अनंत चतुदर्शीला या ठिकाणी दादा, बाबा व इतर मानाच्या मूर्र्तींचे विसर्जन करण्यात येते. त्यामुळे या विहिरीच्या परिसरात देखील आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. दरम्यान, या ठिकाणी गुरे बांधण्यात येतात. कचरा, शेण यांचा ढिगारा या ठिकाणी असतो. दुर्गंधी देखील मोठ्या प्रमाणावर असते.
मानाच्या बाप्पांना निरोप देतांना या ठिकाणी प्रसन्न वातावरण राहावे यासाठी या ठिकाणचे उकिरडे आणि इतर घाण हटविण्यात यावी अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे. जे रहिवासी व गुरे मालक ऐकणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे. अनंत चतुदर्शीच्या दिवशी मोठ्या संख्येने मूर्ती विसर्जन होणार आहे. त्यामुळे कृत्रिम तलावांच्या ठिकाणी आणखी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
निर्माल्य संकलनासाठी देखील पालिकेने वेगळी व्यवस्था करावी. काल अनेकांनी मूर्ती सोबत निर्माल्य देखील तलावात टाकल्यामुळे दुसºया दिवशी पालिकेला स्वच्छता करावी लागली.