पूलाच्या बांधकामात अवैध पद्धतीने घरगुती सिलिंडरचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:38 IST2021-02-25T04:38:44+5:302021-02-25T04:38:44+5:30

प्रकाशा : शहादा तालुक्यातील कोळदा ते सेंधवा रस्त्यावरील तापी नदीवर उभारण्यात येणाऱ्या नवीन पुलाचे बांधकाम काम सुरू असून, ...

Illegal use of domestic cylinders in bridge construction | पूलाच्या बांधकामात अवैध पद्धतीने घरगुती सिलिंडरचा वापर

पूलाच्या बांधकामात अवैध पद्धतीने घरगुती सिलिंडरचा वापर

प्रकाशा : शहादा तालुक्यातील कोळदा ते सेंधवा रस्त्यावरील तापी नदीवर उभारण्यात येणाऱ्या नवीन पुलाचे बांधकाम काम सुरू असून, गेल्या दोन वर्षापासून हे काम संथ गतीने सुरू आहे. या पुलाचे खांब उभारणीचे काम सुरू असून, या खांबाच्या वरील बाजूला करण्यात येणाऱ्या वेल्डिंग कामाला चक्क घरगुती सिलिंडरचा वापर करण्यात येत असल्याने धोका वाढला आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम कामासाठी घरगुती सिलिंडर ठेकेदाराला कुठून उपलब्ध होतात याची चौकशी होणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी ‘लोकमत’ने या वृत्त प्रकाशित करताच त्याची महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेत धडक मोहीम राबवून दोन सिलिंडर ताब्यात घेतले होते.

कोळदा ते सेंधवा या रस्त्याचे काँक्रिटीकरणचे काम सुरू असून, तापी नदीवर नवीन पुलाच्या पाया उभारणीसाठी काम सुरू आहे. मात्र या रस्त्याचे काम घेतलेल्या ठेकेदाराच्या काम करण्याच्या पद्धतीने हा पूल प्रकाश झोतात राहिला आहे. तापी नदीवर नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुलासाठी आवश्यक असणारे खांब उभे करण्याचे काम सुरू असताना नदीत खड्डे करण्यात येत होते. त्याप्रसंगी खडक फोडण्यासाठी ब्लास्टिंग करण्यात येत होती. या प्रकारामुळे नदीतील जुन्या पुलाला धक्का बसण्याची शक्यता वाढली होती. तरीही ठेकेदाराकडून वेल्डिंग कामासाठी अवैध घरगुती सिलिंडरचा वापर करण्यात येत आहे. तसेच डिसेंबर महिन्यात ठेकेदाराकडून तापी नदीवरील बॅरेजचा भराव काढण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतीला धोका निर्माण होणार असल्याने शेतकऱ्यांकडून विरोध करण्यात आला. या घटनेची प्रशासनाने दखल घेऊन बॅरेज जवळील जागेचा पंचनामा करण्यात केला होता. मात्र यानंतरही बांधकामांच्या ठिकाणी घरगुती सिलिंडरचा वापर होत असल्याने परिसरातील ग्रामस्थाकडून कुतूहल व्यक्त करण्यात येत आहे. ठेकदाराकडून बेकायदेशीरपणे घरगुती सिलिंडचा वापर करण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांकडून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सिलिंडरच्या चौकशीची मागणी

सिलिंडरची ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर ग्राहकांला सिलिडंर देण्यात येत असतो. मात्र पुलाच्या कामासाठी घरगुती सिलिंडर वापरण्यात येत असल्याने हे सिलिंडर कुठून होतात याची चौकशीची करण्याची गरज आहे. बांधकामासाठी घरगुती सिलिंडर कोणती गॅस कंपनी पुरवत आहे. याचाही शोध महसूल विभागाने घेऊन संबंधित गॅस एजन्सीवर कारवाई केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुलांचे बांधकाम करताना नियमबाह्य क्लुप्त्या वापरणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

कामगारांना सुरक्षा साधने नाहीत

४०० ते ५०० फूट एवढ्या उंचावर पुलांचे काम सुरू असून, या उंचावर काम करत असताना कामगारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने देण्यात आली नसल्याचे दिसून येत आले आहे. कामगांराना डोक्यावर सुरक्षासाठी हेल्मेट आणि बेल्ट नसल्याने कामगांराना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. कामाच्या ठिकाणी खालील भागात ठिकठिकाणी संरक्षणासाठी जाळी लावण्यात आली नसल्याने कामगारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

घरगुती सिलिंडरचा वापर फक्त घरात करता येतो. मात्र इतर ठिकाणी त्याचा वापर होत असेल तर कारवाई करण्यात येते. संबंधित ठिकाणी चौकशी करून तत्काळ कारवाई करण्यात येईल. - डॉ. मिलिंद कुलकर्णी, तहसीलदार, शहादा

Web Title: Illegal use of domestic cylinders in bridge construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.