राजस्थानमधून उंटांची अवैध वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:26 IST2019-11-16T12:26:14+5:302019-11-16T12:26:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : पुष्कर येथुन सोलापूरकडे क्रूरपणे उंटांची वाहतूक करणा:या ट्रकसह चालक व वाहकास नवापूर पोलीसांनी ताब्यात ...

राजस्थानमधून उंटांची अवैध वाहतूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : पुष्कर येथुन सोलापूरकडे क्रूरपणे उंटांची वाहतूक करणा:या ट्रकसह चालक व वाहकास नवापूर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. आज सकाळी महामार्गावर हा प्रकार घडला.
पोलीस सुत्रानुसार, शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील दोन युवक अक्षित अग्रवाल व नीरव अग्रवाल गुजरात राज्यातील सोनगड येथे मोटरसायकलीने जात असतांना नागपूर-सुरत महामार्गावरील रोकड्या हनुमान मंदिराजवळून धुळ्याकडे जात असलेला ट्रक (क्रमांक आरजे 14 जी एच 9572) त्यांच्या नजरेस पडला. त्यामध्ये 18 उंट दाटीवाटीने भरलेले दिसुन आले. राजस्थान राज्यातील पुष्कर येथुन राज्यातील सोलापूर येथे ट्रकमधुन विना परवाना व दाटीवाटीने उंटाची वाहतूक होत असल्याचे लक्षात आल्यावर उंटानी भरलेले ट्रक गौरक्षा समितीचे पदाधिकारी अक्षित अग्रवाल, नीरव अग्रवाल, दर्शन पाटील व जितेंद्र अहिरे यांनी महामार्गावर पकडुन पोलीसांना कळविले. पोलीसांनी ट्रकसह 18 ऊंट ताब्यात घेतले.
अधीक चौकशी केली असता ट्रक चालकाकडे वाहतूकीचा परवाना नव्हता. प्राण्यांना क्रुरतेने वागणूक देण्यास प्रतिबंध अधिनियम व मोटरवाहन अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या 18 उंटांच्या खरेदीच्या पुष्कर येथील पशुमेळ्यातील पावत्या आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीसांनी ट्रकसह 18 ऊंट ताब्यात घेऊन चालक खालीद मामला, रा. रिठाठ, ता. फिरोजपूर, जिल्हा नुह (हरियाणा) व सलमान फरमान कुरेशी रा. खेतीपूरा मोहल्ला, बागपथ (उत्तर प्रदेश) यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर शिंपी व सहकारी पुढील तपास करीत आहेत.