ढाब्यांवरील अवैध दारु विक्री बंद करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:59 IST2020-03-13T12:59:16+5:302020-03-13T12:59:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहर व परिसरात रहिवासी प्रयोजनार्थ असलेल्या जागांवर विनापरवाना ढाब्यांवर सुरु असलेली अवैध दारु विक्री ...

Illegal liquor sales on dhabas should be stopped | ढाब्यांवरील अवैध दारु विक्री बंद करावी

ढाब्यांवरील अवैध दारु विक्री बंद करावी

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहर व परिसरात रहिवासी प्रयोजनार्थ असलेल्या जागांवर विनापरवाना ढाब्यांवर सुरु असलेली अवैध दारु विक्री बंद करुन संबंधित जागा मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी शहादा शहर व तालुका बिअरबार, परमीट रुमचालक व देशी दारु विक्रेते असोशिएशनतर्फे प्रांताधिकारी चेतन गिरासे व तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
असोसिएशनतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहादा शहर व परिसरात शासनाची कुठलीही परवानगी न घेता खुलेआमपणे ढाब्यांवर अवैधरित्या मद्य विक्री सुरु आहे. अशा ठिकाणी बनावट मद्य विक्री होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण काही दिवसापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने मलोणी, ता.शहादा परिसरात धाड टाकून बनावट मद्य निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला होता व मध्य प्रदेशातील दोन आरोपींसह सुमारे १२ लाख ६६ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या ढाबे चालकांकडे मद्यविक्रीचा अधिकृत परवाना नसल्याने येथे सुरु असलेली मद्यविक्री ही अवैध असून यात बनावट मद्याचा समावेश असू शकतो.
शहादा शहर व परिसरात सुरु असलेल्या ढाब्यांच्या जमिनी या रहिवासी प्रयोजनार्थ अकृषीक (एन.ए.) झाल्या असून येथे हॉटेल व्यवसाय कायद्यानुसार सुरु करता येत नाही. असे असतांनाही कुठलाही व्यावसायिक व वाणिज्यीक परवाना नसताना हे ढाबे गेल्या अनेक वर्षापासून खुलेआमपणे सुरु आहे. त्याचप्रमाणे या हॉटेल व ढाबे चालकांकडे खाद्य पदार्थ विक्रीसाठी आवश्यक असलेले फुड लायसन्सही नाही. असे असतांनाही या ठिकाणी हॉटेल व ढाबे सुरु आहेत. परवानाधारकांना दरवर्षी एप्रिल महिन्यात परवाना नूतनीकरण करताना जागेबाबत वाणिज्य प्रयोजन व खाद्य पदार्थ विक्रीसाठी फुड लायसन्स आवश्यक असते. हे दोन्ही प्रकार नसले तर आमचा परवाना नूतनीकरण होत नाही. हाच नियम या ढाबे चालकांना का नाही? त्यांच्याकडे कुठलाही अधिकृत परवाना नसताना नियमबाह्यरित्या त्यांच्याकडून हॉटेल व ढाबे व्यवसाय सुरु असल्याने त्यांच्यावर अद्यापपावेतो संबंधित विभागांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. या अवैध ढाब्यांवर व जागा मालकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर अरुण चौधरी, संजय चौधरी, राहुल चौधरी, शितल जयस्वाल, बी.एम. जयस्वाल आदीसह परमीटरुम चालक, देशी दारू विक्रेत्यांच्या सह्या आहेत.

आम्ही लोकशाही मार्गाने गेल्या सहा महिन्यापासून याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख व जिल्हा निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग नंदुरबार यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे पाठपुरावा करीत आहोत. मात्र अद्याप कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. आपण जागेच्या प्रयोजनात बदल करणाऱ्या जागा मालकांसह येथे सुरु असलेल्या हॉटेल व ढाबे व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. निवेदनासोबत शहर व परिसरात सुरु असलेल्या ढाब्याची यादीही सादर केली आहे.

Web Title: Illegal liquor sales on dhabas should be stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.