शाळा आणि अंगणवाड्यांचे बांधकाम दर्जेदार नसेल, तर कारवाई करा- पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:31 IST2021-08-15T04:31:45+5:302021-08-15T04:31:45+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, खासदार डॉ. ...

If the construction of schools and anganwadas is not of quality, then take action- Guardian Minister | शाळा आणि अंगणवाड्यांचे बांधकाम दर्जेदार नसेल, तर कारवाई करा- पालकमंत्री

शाळा आणि अंगणवाड्यांचे बांधकाम दर्जेदार नसेल, तर कारवाई करा- पालकमंत्री

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, खासदार डॉ. हिना गावीत, आमदार डॉ. विजयकुमार गावीत, शिरीषकुमार नाईक, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आदी उपस्थित होते.

ॲड. पाडवी म्हणाले, जिल्ह्यातील वर्गखोल्या आणि अंगणवाड्यांच्या बांधकामाला गती देण्यात यावी, अंगणवाडीमध्ये विद्युत आणि नळजोडणीची व्यवस्था करण्यात यावी, आवश्यक असेल तिथे सुविधा देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा,

नवापूर येथील १३२ केव्ही विद्युत उपकेंद्राच्या कामाबाबत त्वरित कार्यवाही करावी, अक्कलकुवा येथेदेखील अशा उपकेंद्राच्या आवश्यकतेबाबत पाहणी करून प्रस्ताव सादर करावा, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आदिवासी युवकांना उपयुक्त असलेले अभ्यासक्रम घेण्यात यावे. या अभ्यासक्रमातून विद्यार्थांना रोजगार मिळायला हवा, असे त्यांनी सांगितले.

बैठकीत आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम, पर्यटन व यात्रास्थळ परिसरातील सुविधा, वाडी-पाड्यावरील विद्युत जोडणी, नर्मदा किनाऱ्यावरील गावांना पाण्याची सुविधा आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी उपयोजना आणि अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत झालेल्या कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. यावेळी लोकप्रतिनिधींनी विविध विषयांवरील चर्चेत सहभाग घेतला.

जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ अंतर्गत सर्वसाधारण योजनेत १३० कोटी रुपये मंजूर नियतव्यय असून, सहा कोटी ३६ लक्ष आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत मंजूर २९७ कोटी ६ लक्ष नियतव्ययापैकी ९ कोटी १० लक्ष खर्च झाला आहे. अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत ११ कोटी ७३ लक्ष नियतव्यय मंजूर करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीत पीक परिस्थितीवर चर्चा

जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने बैठकीत जिल्ह्यातील पीक परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना कमी पाण्यात घेता येणाऱ्या भगरसारखे पीक घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात यावे. जिल्ह्यातील विविध प्रकल्पांत उपलब्ध पाणी लक्षात घेऊन पुढील कालावधीसाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा कालावधी वाढविण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकारच्या स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी गिर्यारोहक अनिल वसावे याचा माउंट एलब्रूस शिखर सर केल्याबद्दल खासदार डॉ. गावीत यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: If the construction of schools and anganwadas is not of quality, then take action- Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.