पक्षापेक्षा कुणी मोठे समजत असेल तर त्याने रामराम घ्यावा- जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:33 IST2021-02-11T04:33:37+5:302021-02-11T04:33:37+5:30

नंदुरबार : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परिवार संवाद यात्रेनिमित्त जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ...

If anyone thinks he is bigger than the party, he should say goodbye - Jayant Patil | पक्षापेक्षा कुणी मोठे समजत असेल तर त्याने रामराम घ्यावा- जयंत पाटील

पक्षापेक्षा कुणी मोठे समजत असेल तर त्याने रामराम घ्यावा- जयंत पाटील

नंदुरबार : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परिवार संवाद यात्रेनिमित्त जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना विविध प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. तयारी कशी करून यायची याचेही कानमंत्र त्यांनी दिले. दरम्यान, परिवार संवाद मेळाव्यात बोलतांना त्यांनी पक्षापेक्षा कुणी स्वत:ला मोठा समजत असेल तर त्याला पक्षाचा रामराम राहील असे सुनावत गटबाजी करणाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला मारला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील हे सोमवारी नंदुरबारात आले होते. दुपारी तीन वाजता त्यांनी जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेत मार्गदर्शन केले. त्याआधी त्यांनी नंदुरबार, तळोदा-शहादा, नवापूर व अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांना विविध बाबींची माहिती विचारली, काही पदाधिकारी यांना त्याची माहिती होती तर काही जण सांगतांना अडखळले. त्यामुळे त्यांनी पदाधिकारी यांना विविध टिप्स दिल्या. पक्षाचे संघटनात्मक काम करतांना कुठले मुद्दे आणि कशावर काम केले पाहिजे यावर त्यांनी मार्गदर्शन केले. पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचवा. पक्ष सत्तेत असल्यामुळे सर्वसामान्यांची जास्तीत जास्त कामे करा. पद मिळाले म्हणजे आपण मोठे झालो असे समजू नका. नेहमीच कार्यकर्ता म्हणूनच काम केले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केेले. शिवसेना, काँग्रेससोबत आपण सत्तेत आहोत हेदेखील नेहमीच लक्षात असू द्या असे त्यांनी सांगितले. सर्वच मतदारसंघात पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

स्वत:ला मोठे समजू नका...

विधानसभानिहाय आढावा घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, सुरज चव्हाण, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत वरपे, सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी युवतीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, महिला आघाडीच्या हेमलता शितोळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीला त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे म्हणणे ऐकूण घेतले. सहा जणांनी आपले म्हणणे मांडले. त्यानंतर बोलतांना जयंत पाटील यांनी पक्षात गटबाजीला थारा नको, प्रत्येकाने आपला पक्ष म्हणून काम करावे. पक्षापेक्षा कुणी मोठे होत असेल, तसे समजत असेल तर त्यांना पक्षात जास्त दिवस थांबता येणार नाही. त्यांनी रामराम घेतला तरी चालेल असेही त्यांनी सांगितले. पक्षवाढीसाठी प्रत्येकाने वेळ द्यावा. प्रत्येक सेलची कार्यकारिणी गठित करताना सर्वसमावेशक अशी करावी. मेळावे, बैठका यांना प्रत्येकाने उपस्थित राहावे. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करावे असे सांगून बूथ लेव्हलला काम करावे. संघटनात्मक काम करतांना सूक्ष्म नियोजन करूनच काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही मार्गदर्शन केेले. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष डॅा.अभिजीत मोरे यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या संघटनात्मक कामाची माहिती सादर केली व पक्षवाढीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

Web Title: If anyone thinks he is bigger than the party, he should say goodbye - Jayant Patil