मेरे पास सिर्फ माँ है..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST2021-06-04T04:23:33+5:302021-06-04T04:23:33+5:30
नंदुरबार : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत तब्बल ६२१ जणांचा बळी गेला आहे. बळी गेलेले अनेक जण कुटुंबाचा ...

मेरे पास सिर्फ माँ है..!
नंदुरबार : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत तब्बल ६२१ जणांचा बळी गेला आहे. बळी गेलेले अनेक जण कुटुंबाचा आधारस्तंभ होते. त्यांच्या जाण्याने त्यांच्या मागे शिल्लक असलेले वारस हे आर्थिक संकटात आले असून त्यातून मार्ग काढावा कसा, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
जिल्ह्यात एप्रिल २०२० ते जून २०२१ या काळात कोरोनामुळे ८२१ जणांचा मृत्यू झाला आहे. संसर्ग वाढत गेल्याने तब्ब्येत खालावून, वेळेवर उपचार न मिळाल्याने तसेच उपचारानंतरही बरे होऊन अचानक मृत्यू ओढावलेल्या मयतांमागे त्यांचे कुटुंब आहेत. जिल्ह्यात मयत झालेल्या ९० टक्के नागरिकांचे वय ४० च्या पुढे होते. घरातील कर्ते पुरुष असल्याने त्यांचे मागे पत्नी, मुले, मुली, आई-वडील असा परिवार आहे. उपवर-मुले, मुली विवाहयोग्य असल्याने घरातील कर्ता गेल्याने त्यांचे विवाह थांबले आहेत. शेतकरी कुटुंबातील काहींच्या घरी खरीप हंगामाची जबाबदारी घेणाराही कुणी नसल्याने त्या घरांची जबाबदारी महिलांवर पडली आहे. बहुतांश ठिकाणी ‘आई’ हा एकच आधार असल्याने पुढे काय, असा प्रश्न भेडसावत आहे. नोकरदार, हातमजुरी करणारे यांच्याही घरात सारखीच स्थिती आहे. अद्याप कर्त्या पुरुषांच्या मृत्यूला दोन महिनेही झालेले नसल्याने अनेक घरांमध्ये स्मशान शांतता असल्याचे या भेटीदरम्यान दिसून आले. अनेकांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, ते बोलण्याच्या स्थितीतही नव्हते.
शेतीला आकार कसा द्यावा हाच प्रश्न
तळोदा तालुक्यातील मोड या गावात तब्बल १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मयत झालेल्या सर्वांच्या शोकात त्यांचे कुटुंबीय बुडाले आहेत. यातील तीन ठिकाणी भेट दिली असता, कुटुंब प्रमुख गेल्यानंतर त्यांचे हाल सुरू असल्याचे समोर आले. शेती कसणारा कर्ता पुरुषच गेल्याने आता काय, प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुले लहान असल्याने महिलांवर घरची जबाबदारी आली आहे. शेतीचे व्यवहार कसे सुरू करावेत, खते आणि बियाणे कुठून आणावे, शेती कसावी कशी, त्यासाठीचा पैसा येणार तरी कुठून असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
पती गेले, मुलांच्या भवितव्याचे काय..
शहादा शहरातील कोरोनाबाधितांचे मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्यावर नीट अंत्यसंस्कारही करता आले नव्हते. काहींचे अंत्यविधी ज्याठिकाणी उपचार सुरू होते तेथेच झाले. यातून दवाखान्यात निघालेल्या कर्त्या पुरुषाचे मी येतो बरा होऊन हे शब्द आजही त्याच्या कुटुंबीयांना सतावत आहेत. शहादा शहरातील शिक्षकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची विवाहयोग्य मुली, शिक्षण घेणारा मुलगा यांच्या भवितव्याचे काय असा प्रश्न त्यांच्या आईसमोर असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. यावेळी त्यांचे डोळेही पाणावले होते.
मुलांना वडिलांचा चेहरा आठवणार तरी कसा..
एक मुलगी, एक दीड वर्षाचा मुलगा, आई, भाऊ असा परिवार सोडून अवघ्या पस्तीशीतच एक कर्ता पुरुष कोरोनामुळे मृत झाला. त्याची पत्नी त्याच्या पश्चात घर सांभाळण्याचा प्रयत्न करत असली तरीही मुलांना मोठेपणी वडिलांचा चेहरा तरी आठवेल का, असा प्रश्न तिला सतावत आहे. तांत्रिक व्यवसाय करणारा आपला पती गेल्यानंतर उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. शिक्षण असल्याने घराबाहेर पडून मुलांसाठी काही तरी करावा असा मानस या मातेने व्यक्त केला आहे.
१११ बालकांचे हरपले मातृ किंवा पितृछत्र
नंदुरबार जिल्ह्यात महिला व बालविकास विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ० ते १८ वयोगटातील १११ बालकांचे मातृ किंवा पितृछत्र हरपले आहे. त्यानंतर १९ ते ३९ वयोगटात १९९ जणांचे मातृ किंवा पितृछत्र हरपल्याचे समोर आले आहे. विभागाकडून जिल्ह्यातील विविध भागात सर्वेक्षण गतिमान करण्यात आले असून बालकांना शासनाकडून मदत देणार आहेत.