मरण्याची हौस नाही पण.., परिस्थितीमुळे जीव मुठीत घेऊन राहावे लागतेच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:23 IST2021-06-05T04:23:11+5:302021-06-05T04:23:11+5:30
नंदुरबार : शहरात पडक्या इमारत मालकांना नोटिसा देऊनही संबंधित इमारतींचा धोकादायक भाग काढला जात नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, काही ...

मरण्याची हौस नाही पण.., परिस्थितीमुळे जीव मुठीत घेऊन राहावे लागतेच !
नंदुरबार : शहरात पडक्या इमारत मालकांना नोटिसा देऊनही संबंधित इमारतींचा धोकादायक भाग काढला जात नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, काही इमारतींमध्ये नागरिक राहत असून काही पडक्या आहेत.
दरवर्षी पावसाळ्याच्या आधी पालिकेतर्फे पडक्या इमारती व घरमालकांना नोटिसा देत त्या खाली करणे किंवा दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या जातात. पूर्वी वैयक्तिक नोटिसा दिल्या जात होत्या; परंतु आता सार्वजनिक एकच नोटीस देऊन सूचना केली जाते; परंतु एकही इमारत किंवा घरमालक त्या नोटिसांना जुमानत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे एखाद्या वेळी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नंदुरबार शहरात चारमजली इमारतीपेक्षा अधिक उंच इमारती नाहीत. ज्या पडक्या इमारती आहेत, त्या जुन्या पद्धतीच्या बांधकामाच्या आहेत. अशा ठिकाणी काही भाडेकरू राहतात; तर काही कुटुंबे दुसऱ्या शहरात स्थायिक झाल्याने अशा इमारती व घरांमध्ये कुणीही राहत नाहीत. याशिवाय टेकडी किंवा डोंगरउतारावरील घरांनाही पावसाळ्यात मोठा धोका असतो.