करतो.. बघतो.. यातच दिवस संपतो, उपचार मात्र थांबतो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 12:54 IST2020-08-19T12:53:53+5:302020-08-19T12:54:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या येथील कोविड केअर सेंटरचे भयाण वास्तव समोर आले ...

I do .. I see .. this is the end of the day, but the treatment stops .. | करतो.. बघतो.. यातच दिवस संपतो, उपचार मात्र थांबतो..

करतो.. बघतो.. यातच दिवस संपतो, उपचार मात्र थांबतो..

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या येथील कोविड केअर सेंटरचे भयाण वास्तव समोर आले आहे. येथे रुग्णांना वेळेवर चहा, नाश्ता, जेवण मिळत नाही. जे पॉझिटीव्ह रूग्ण आहेत त्यांना सकस आहार नाही. दोन दोन दिवस रूग्णांच्या खोलीत वीज नाही. शौचालय व बाथरूमची साफसफाई होत नाही. त्यामुळे या सेंटरला जायला सगळे घाबरतात. एखद्या रुग्णाने जर तक्रार केली तर कर्मचारी म्हणतात बघतो... करतो... असेच उत्तर मिळते. वरिष्ठांची याठिकाणी नियमित भेट नसल्याने तक्रार करावी तर कोणाकडे? अशी व्यथा येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांनी मांडली.
कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासोबतच या बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना विलगीकृत करण्यासाठी प्रशासनाने मोहिदा येथील शासकीय वसतिगृहाच्या चार इमारतीत कोविड केअर सेंटरची निर्मिती केली आहे. मात्र या सेंटरमधील समस्या व दूरवस्था हे वादाचे मुद्दे ठरले आहेत. याठिकाणी शंभरपेक्षा अधिक नागरिकांना विलगीकृत करण्यात आले असून बाधितांवर उपचार सुरू आहेत. नियमानुसार येथे उपचार घेणाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यासह त्यांना योग्य तो औषधोचार देण्यासह सकस आहार देणे बंधनकारक असताना येथील जेवणाबाबत सर्वाधिक तक्रारी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून होत आहेत.
प्रशासनाने भोजन व्यवस्थेसाठी खाजगी ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. प्रती रुग्ण प्रती दिवस १२० रुपये असा दर ठरविण्यात आला आहे. यात सकाळी चहा व नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा व रात्रीचे जेवण यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मात्र संबंधित ठेकेदाराकडून नियमानुसार भोजन पुरवठा केला जात नाही. सकाळच्या चहाबद्दल न बोललेलेच बरे. दररोज नाश्त्यामध्ये पोहे किंवा उपमा असा पुरवठा केला जात आहे. चपात्या करपलेल्या असतात तर भाज्यांबद्दल काय बोलावे. वरण-भात काही प्रमाणात ठीक असतो. रुग्णाला सकस आहार आवश्यक असताना त्याचा पुरवठा केला जात नाही. परिणामी अनेक रुग्ण हे उपचाराच्या कालावधीत आपल्या घरच्या डब्यावरच अवलंबून असतात, अशी येथील स्थिती आहे.
येथे उपचार घेणाºया रूग्णांची परिस्थिती अवघड आहे. केवळ दिवसभरातून एकदा तापमानाची मोजणी केली जाते. याव्यतिरिक्त नियमित कुठले औषध, गोळ्या नाही. ज्या औषधी दिल्या गेल्या आहेत त्यांची मुदत पुढील महिन्यात सप्टेंबर २०२० ला संपणारी आहे. त्याचप्रमाणे गोळ्यांच्या पाकीटांना झुरळ किंवा उंदराने कुरतडल्यासारखी परिस्थिती पाकिटावर दिसते. दिवसभरात कुठली औषधी मिळणार नसेल तर येथे थांबून काय फायदा? त्यापेक्षा घरी राहून उपचार केलेले बरे अशा द्विधा मनस्थितीत येथील रुग्ण आहेत. त्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून या कोविड केंद्रात रूग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

४एकीकडे शासन म्हणते की बाधित रुग्णांनी दिवसभर गरम पाणी प्राशन करावे, मात्र तेही येथे उपलब्ध करून दिले जात नाही. त्याचप्रमाणे गेल्या चार दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्याने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत दररोज आंघोळीसाठी गरम पाणी आवश्यक असते. मात्र येथे एका इमारतीत वीजपुरवठा नाही तर जेथे गिझर बसविले आहे तेथे गरम पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णांचे हाल होतात.
४पिण्यासाठी गरम पाणी मागितले तर गिझरचे पाणी प्या, असा अजब सल्ला या कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना दिला जातो. यापूर्वी या केंद्रात उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांनी व सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांनी या केंद्रातील दूरवस्था प्रशासनाने सोडवावी. बाधितांना योग्य त्या सुविधा द्याव्यात, नियमानुसार भोजन द्यावे, वरिष्ठांनी दिवसातून किमान एकदा अचानकपणे या केंद्राची पाहणी करून व्यवस्था तपासावी, अशी मागणी केली आहे.

भोजन ठेकेदाराला नियमानुसार भोजन देण्याची अट बंधनकारक आहे. दररोज नाश्त्यामध्ये शाकाहारी रुग्णाला फळे तर मांसाहारी रुग्णाला बॉईल अंडी देणे गरजेचे आहे, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आहार हा सकस असावा अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत. अन्न व प्रशासन विभागाला भोजनाचा दर्जा तपासण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रुग्ण वा त्यांच्या नातेवाईकांच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
-डॉ.मिलिंद कुलकर्णी,
तहसीलदार, शहादा.

Web Title: I do .. I see .. this is the end of the day, but the treatment stops ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.