महिला बचत गटाकडून स्वच्छता; नदीपात्रात स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:31 IST2021-03-17T04:31:02+5:302021-03-17T04:31:02+5:30
शहादा तालुक्यातील प्रकाशा हे गाव माझी वसुंधरा या अभियानात समाविष्ट असल्याने गावात विविध उपक्रम राबविले जात आहेत. मंगळवारी येथील ...

महिला बचत गटाकडून स्वच्छता; नदीपात्रात स्वच्छता अभियान
शहादा तालुक्यातील प्रकाशा हे गाव माझी वसुंधरा या अभियानात समाविष्ट असल्याने गावात विविध उपक्रम राबविले जात आहेत. मंगळवारी येथील महिला बचत गट आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत केदारेश्वर मंदिर परिसर, तापी नदी घाट, तापी नदी पात्र, आदी ठिकाणी स्वच्छता माेहीम राबविण्यात आली.
याठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांनी दर्शनासाठी किरकोळ गर्दी केली होती. तापी नदीच्या घाटावर निर्माल्य तथा विविध देवदेवतांच्या भग्न अवस्थेतील फोटो, मूर्ती आढळून आल्या. तसेच नदीच्या पात्रात देखील अस्वच्छता दिसून आल्याने माझी वसुंधरा अभियानांतर्गत तापी घाटावर बचत गटातील सर्व महिलांनी एकत्र येत सर्वप्रथम स्वच्छता केली. त्यानंतर तेथील केरकचरा गोळा करून जाळण्यात आला. यावेळी परिसरामध्ये पडलेले विविध देवदेवतांचे फोटो एकत्रित करून त्यांना पुन्हा एका ठिकाणी ठेवण्यात आले.
यासाठी सरपंच सुदाम ठाकरे, उपसरपंच भरत पाटील, ग्रामविकास अधिकारी बी. जी. पाटील यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी, महिला बचत गटाच्या महिला, आदींनी स्वच्छता मोहीम राबवून सर्व केरकचरा घंटागाडीत टाकून बाहेर काढण्यात आला.
या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत गावात विविध उपक्रम राबविण्यात येत असून, संपूर्ण गावातून दररोज घंटागाडीद्वारे कचरा गोळा केला जात आहे. दरम्यान, वृक्षारोपणासह पाणी आडवा, पाणी जिरवा उपक्रम सुरू असल्याचे सांगण्यात आले.