उसाच्या पेमेंटसाठी उपोषणाचा इशारा, आयान शुगर कारखाना; प्रकाशा येथे बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST2021-06-30T04:20:11+5:302021-06-30T04:20:11+5:30
सविस्तर वृत्त असे की, प्रकाशासह परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी समशेरपूर येथील आयान शुगर कारखान्याला ऊस पुरविला आहे. मात्र तीन महिने ...

उसाच्या पेमेंटसाठी उपोषणाचा इशारा, आयान शुगर कारखाना; प्रकाशा येथे बैठक
सविस्तर वृत्त असे की, प्रकाशासह परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी समशेरपूर येथील आयान शुगर कारखान्याला ऊस पुरविला आहे. मात्र तीन महिने उलटूनही या शेतकऱ्यांना अद्याप उसाचे पेमेंट मिळालेले नाही. कारखान्याचे कार्यकारी संचालक, मुख्य लेखापाल यांना वेळोवेळी भेटून ऊस पेमेंट मिळावे म्हणून विनंती करूनही पेमेंट मिळाले नाही. उसाचे पेमेंट मिळावे याबाबत येथील तोताराम महाराज मंदिर सभागृहात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडेही ऑनलाइन मेलद्वारे तक्रार पाठवली आहे. चार दिवसांत पेमेंट मिळाले नाही तर शेतकरी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण करतील. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असे सर्वानुमते ठरविण्यात आले. तीन महिने होऊनही उसाचे पेमेंट मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. खरीप हंगामाला सुरुवात झाली असून पेरणीसाठी बी-बियाणे, खते, किटकनाशके खरेदीसाठी पैसे नाहीत. कारखान्याने उसाचे थकीत पेमेंट व्याजासह अदा करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनात केली आहे. हे निवेदन साखर आयुक्तालय पुणे, जिल्हाधिकारी नंदुरबार, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नंदुरबार, तहसीलदार नंदुरबार, पोलीस निरीक्षक तालुका पोलीस स्टेशन नंदुरबार, सहायक निबंधक सहकारी संस्था शहादा, कार्यकारी संचालक आयान शुगर लि. समशेरपूर यांना पाठविण्यात आले आहे. निवेदनावर उसाचे पेमेंट थकलेल्या शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.