बिलगावचा धबधबा आणखी किती बळी घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 12:34 IST2020-11-12T12:34:05+5:302020-11-12T12:34:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला धडगाव तालुक्यातील बिलगाव येथील उदय नदीवरील धबधबा अनेकांचा बळी घेत ...

बिलगावचा धबधबा आणखी किती बळी घेणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला धडगाव तालुक्यातील बिलगाव येथील उदय नदीवरील धबधबा अनेकांचा बळी घेत आहे. या ठिकाणी प्रशासनाने संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. अभाविपचा एक खंदा कार्यकर्त्याला बुधवारी याच धबधब्यात जीव गमवावा लागला.
सातपुडा पर्यटनाची खाण आहे. अनेक दऱ्या, उंचच उंच पहाड, उंचावरून कोसळणारे धबधबे, हिरवळ, खळाळून वाहणारे नाले हे निसर्ग सौंदर्य पहाण्याची मजा काही औरच आहे. पावसाळ्याचे चार महिने आणि हिवाळ्याचे दोन महिने येथील निसर्ग सौंदर्य काही औरच असते. याच सौंदर्यातील खाणीमधील बिलगाव येथील बारा धा-या धबधबा. युवकांचे खास आकर्षण असलेल्या या धबधब्याच्या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटनासाठी युवकांची गर्दी होते. त्यातच अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.
धडगाव तालुक्यातील दऱ्याखोऱ्यातून खळाळून वाहणारी उदय नदी अनेक गाव, पाड्यांची तहाण मिटवते. बिलगाव येथे नैसर्गिक उत्तम साईट लाभल्याने येथे लहान, मोठे १२ धबधबे निर्माण झाले आहेत. त्यामुळेच त्याला बाराधाऱ्या धबधबा असे नाव पडले आहे. येथील सुंदर नैसर्गिक वातावरण अनुभवण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. परंतु येथील पाण्याचा अंदाज अनेकांना येत नाही. त्यामुळे येथील डोहात बुडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. तीन वर्षांपूर्वी तळोदा येथील दोन सख्खे भावांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या वर्षी देखील एकाचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वीही काहींचा मृत्यू झाला आहे. चार वर्षात सहा जणांना येथे जलसमाधी मिळाली आहे. वारंवारच्या होणाऱ्या घटना पहाता या ठिकाणी सुरक्षात्मक उपाययोजना व मार्गदर्शक फलक लावणे आवश्यक आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
- वीज निर्मिती प्रकल्प
- नर्मदा आंदोलनातर्फे या ठिकाणी वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला होता. या प्रकल्पावर आधारीत एका चित्रपटाची देखील निर्मिती करण्यात आली आहे.
- १२ वर्षांपूर्वी आलेल्या पुरात हा प्रकल्प वाहून गेला होता.
- उदय नदी येथून पुढे नर्मदा नदीला मिळते. त्यामुळे बिलगावला नदीचा पाण्याचा वेग अधीक राहत असतो. परिणामी धबधबेही प्रवाही असतात.
- येथून जवळच नर्मदा नदी बॅक वाॉटरचा भूषा पॅाईंट देखील आहे.