प्रकाशा ते शहादा मार्गावरील अपूर्ण काम अजून किती बळी घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 12:30 PM2020-11-21T12:30:35+5:302020-11-21T12:30:42+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा :  कोळदा ते सेंधवा मार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्यात प्रकाशा ते शहादा दरम्यानच्या मार्गाचे ...

How many more victims will the unfinished work on Prakasha to Shahada Marg take? | प्रकाशा ते शहादा मार्गावरील अपूर्ण काम अजून किती बळी घेणार

प्रकाशा ते शहादा मार्गावरील अपूर्ण काम अजून किती बळी घेणार

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा :  कोळदा ते सेंधवा मार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्यात प्रकाशा ते शहादा दरम्यानच्या मार्गाचे काम सुरू आहे. मात्र ज्याठिकाणी काम अपूर्ण आहे त्याठिकाणी खड्डे पडले आहेत. तयार झालेला रस्ता आणि राहिलेले काम यात अंतर जास्त असल्याने वाहने चढ-उतार करताना स्लीप होत आहेत. कच्च्या रस्त्यावर पाणी  शिंपडले जात नसल्याने उडणारी धूळ अपघातांना कारणीभूत ठरत आहे. या अपघातांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागत असून गुरुवारी डामरखेडा गावाजवळ अशाच स्थितीमुळे एका शिक्षकाचा अपघात होऊन त्यांना प्राण गमवावा लागल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्त असे की, कोळदा ते सेंधवा दरम्यान चार वर्षापासून काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. याच मार्गावर अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्ग येतो. मात्र हे काम करत असताना काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी रस्त्याच्या कामात जात असल्याने काही ठिकाणी हा विषय न्यायप्रविष्ठ आहे म्हणून पाच ते सहा ठिकाणी  काम अपूर्ण आहे.  परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. नंदुरबारकडून येताना समशेरपूर ते कोरीट फाटा या दरम्यान काम अपूर्ण आहे.  कोरीट फाटा ते तापीनदी पुलापर्यंत रस्त्याचे काम अपूर्ण आहे. तापी नदी पुलावर खड्डे पडले आहेत. तापी नदी पूल ते तळोदा चौफुलीपर्यंतचा मार्ग अद्याप झालेला नाही. प्रकाशा बसस्थानकाच्या वळणावरही काम अपूर्ण आहे. प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान कोकणी माता मंदिरापासून काम अपूर्ण आहे. परिणामी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मातीने खड्डे भरल्यामुळे वाहन गेल्यानंतर धूळ उडते. सायंकाळच्या वेळेला या धुळीमुळे समोरचे वाहन दिसत नसल्याने     अपघात होत आहेत.  नवीन रस्ता व जुना रस्ता या दोघांना जोडताना संबंधित ठेकेदाराने कोणतीच काळजी घेतली नाही म्हणून नवीन रस्त्यावरुन जुन्या रस्त्यावर ये-जा करताना वाहने स्लीप होऊन अपघात होतात. रस्त्याच्या अशाच स्थितीमुळे गुरुवारी डामरखेडा गावाजवळ एका शिक्षकाच्या मोटारसायकलल अपघात होऊन    त्यांना प्राण गमवावे लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा शिक्षक डामरखेडाकडून प्रकाशाकडे येताना गोमाई नदीवरील पुलाजवळ नवा काँक्रीट रस्ता व जुना रस्ता यांच्यामध्ये मोठे अंतर आहे. नवीन कॉक्रीटवरून जुन्यावर येताना मोटारसायकल आदळून स्लीप झाली. त्याचवेळी समोरुन वाळूने भरलेल्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने या शिक्षकाचा चिरडून मृत्यू झाला. जर रस्ता चांगला राहिला असता तर शिक्षकाला आपले प्राण गमवावे लागले नसते, अशा प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत. आतापर्यंत या मार्गावर अनेकांना आपला जीव गमवावा लागला  आहे.
अपघाताच्या घटनांमुळे नागरिक संतप्त असून हा मार्ग अजून किती जणांचा जीव घेणार? असा संतप्त सवाल करीत आहेत. संबंधित ठेकेदार व त्यावर निरीक्षण करणारे रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांचे दुर्लक्ष झाले आहे. म्हणून येत्या दोन       दिवसात प्रकाशा गावातील शेतकरी व ग्रामस्थ रस्ता रोको करणार आहेत व संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा     गुन्हा दाखल करू, असे बोलले जात आहे.

साखर कारखाने सुरू झाल्याने वाहतूक वाढली
प्रकाशा-शहादा रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ वाढली आहे.  समशेरपूर व सातपुडा साखर कारखाना सुरू झाल्याने ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रक यांची ये-जादेखील वाढलली आहे. तसेच पपई घेऊन जाणारे मालट्रक आदींसह अवजड वाहन यांची संख्या वाढली आहे. 
वाढत्या वाहतुकीचा विचार करून संबंधित ठेकेदाराने नियोजन करणे गरजेचे आहे. ज्याठिकाणी अपूर्ण काम आहे ते त्वरित करणे आवश्यक आहे. ज्या ज्या ठिकाणी काम पूर्ण व अपूर्ण आहे अशा ठिकाणी रस्ता वाहतूकयोग्य करण्याची गरज आहे. रस्त्याच्या आजूबाजूला वाढलेली झाडेझुडपे काढणे आवश्यक आहे. कच्च्या रस्त्यामुळे उडणाऱ्या धुळीने पिके खराब होत असल्याने शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे.
 प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान व गोमाई नदीवरील पूल शेवटची घटका मोजत तग धरुन आहे. या पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून संरक्षक कठड्यांना तडे जाऊन लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. हा पूल केव्हाही कोसळू शकतो, अशी स्थिती झाली आहे. 
 

Web Title: How many more victims will the unfinished work on Prakasha to Shahada Marg take?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.