पुणे रेल्वेचे रडगाणे आणखी किती दिवस?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST2021-06-17T04:21:19+5:302021-06-17T04:21:19+5:30
मनोज शेलार वर्षानुवर्षांपासून मागणी असलेल्या नंदुरबारमार्गे पुणे रेल्वेची स्वप्नपूर्ती दृष्टीपथात आली असताना अचानक माशी शिंकली आणि स्वप्नपूर्ती होता होता ...

पुणे रेल्वेचे रडगाणे आणखी किती दिवस?
मनोज शेलार
वर्षानुवर्षांपासून मागणी असलेल्या नंदुरबारमार्गे पुणे रेल्वेची स्वप्नपूर्ती दृष्टीपथात आली असताना अचानक माशी शिंकली आणि स्वप्नपूर्ती होता होता राहिली. पुणे रेल्वेचे रडगाणे थेट रेल्वेमंत्र्यांपासून ते स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांपर्यंत, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना, रेल्वे सल्लागार समिती यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी गायिले आहे. परंतु रेल्वेने मात्र जिल्हावासीयांच्या मागणीला थारा दिलेला नाही. गेल्या आठवड्यात अशी रेल्वे सुरू होणार असल्याचे विविध माध्यमातून पुढे आले. परंतु लागलीच पश्चिम रेल्वेने अशी कुठलीही प्रवासी रेल्वे सुरू होणार नसल्याचे स्पष्ट केले आणि जिल्हावासीयांचा हिरमोड झाला.
नंदुरबार रेल्वेस्थानक हे पश्चिम रेल्वेच्या ताप्ती सेक्शनवरील मध्यवर्ती आणि मोठे स्थानक आहे. या मार्गावरील सर्वच रेल्वे गाड्यांना येथे थांबा आहे. दुहेरीकरणामुळे नंदुरबार स्थानकाचे महत्त्वदेखील वाढले आहे. त्यामुळे नंदुरबारमधून किंवा नंदुरबारमार्गे मुंबई आणि पुण्यासाठी रेल्वेसेवा सुरू करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. मुंबईसाठी एक एक्सप्रेस या मार्गाने सुरू झाली आहे. परंतु त्या एक्सप्रेसची वेळ नंदुरबारकरांना सोयीची होणारी नसल्याने फारसा प्रतिसाद नाही. पुण्यासाठीच्या एक्सप्रेसची प्रतीक्षा मात्र कायम आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील अनेक कुटुंबे नोकरी निमित्ताने पुण्यात स्थायिक झाली आहेत. अनेक विद्यार्थी पुणे येथे शिक्षण घेत आहेत. रोजगारासाठी अनेकजण स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे पुण्याशी नंदुरबारकरांची नाळ मोठ्या प्रमाणावर जोडली गेली आहे. परिणामी प्रवासी संख्यादेखील वाढतच आहे. नंदुरबार व शहादा येथून दररोज आठ ते दहा खासगी लक्झरी बसेस पुण्यासाठी जातात. याशिवाय चारही आगारातील पाच ते सात एसटी बसेसदेखील पुण्याला जातात. त्यामुळे प्रवासी संख्या लक्षात घेता प्रवासी रेल्वे सुरू केल्यास मोठी सोय होणार आहे. परंतु आर्थिकदृष्ट्या प्रवासी रेल्वे परवडणारी नसल्याने या मागणीकडे रेल्वेने फारसे लक्ष दिले नसल्याचे चित्र आहे. नंदुरबारहून सुरत, वसईमार्गे ही सेवा परवडू शकते. परंतु ते होणे शक्य नाही. त्यामुळे सुरतहून नंदुरबार, जळगाव, मनमाड, दौंडमार्गे पुणे ही रेल्वे सुरू करणे शक्य आहे. नंदुरबार ते पुणे रेल्वेने या मार्गाने अंतर जवळपास ६०० किलोमीटरपेक्षा अधिक जाते. जरी अशी रेल्वे सुरू झाली तरी तिची वेळ मात्र नंदुरबारकरांना सोयीची ठरेलच असे नाही. येत्या काळात ही रेल्वे सुरू होण्याची दाट शक्यता असून त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू आहेत.
पुणे रेल्वेप्रमाणेच नंदुरबारकरांसाठी दिल्ली कनेक्टीव्हीटीची रेल्वे देखील आवश्यक आहे. ताप्ती सेक्शनमार्गावर दिल्ली कनेक्ट एकही रेल्वे नाही. उत्तर भारतात जाणाऱ्या आठ ते दहा प्रवासी गाड्या या उत्तर प्रदेश व बिहारमध्ये जाणाऱ्या आहेत. दिल्लीला जाण्याकरीता एकतर सुरत किंवा भुसावळ येथे जावे लागते. तेथून दिल्ली कनेक्ट एक्सप्रेस मिळवावी लागते. उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांचा मार्ग दिल्लीमार्गे वळविला तर ते मोठे सोयीचे ठरणार आहे.
मनमाड-इंदूर रेल्वे लाईन झाल्यास नंदुरबारची कनेक्टीव्हीटी देशातील चारही कोपऱ्यांना होणार असे बोलले जात आहे. परंतु या रेल्वेमार्गाचे स्वप्न या पिढीच्या काळात पूर्ण होणे शक्य नाही अशीच एकंदर स्थिती आहे. त्यापेक्षा धुळे-नरडाणा हा ३५ किलोमीटरचा रेल्वे मार्ग जरी केला तरी ते मोठे सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे पुणे किंवा हैद्राबाद व पुढे देशातील पूर्व भागात जाण्यासाठी जळगाव, चाळीसगाव असा फेरा मारणे टळून थेट नरडाणा, धुळेमार्गे चाळीसगाव असा शॉर्टकट मार्ग ताप्तीसेक्शनला मिळणार आहे. त्यामुळे धुळे-नरडाणा या मार्गासाठी आधी आग्रही राहिले पाहिजे.
एकूणच नंदुरबारमार्गे पुणे व दिल्ली कनेक्टीव्हीटी होणे आवश्यक आहे. त्याकरिता लोकप्रतिनिधींनीही दबाव टाकून या मागण्या मान्य करून घेतल्या पाहिजे अशी अपेक्षा जिल्हावासीयांची आहे.